शुक्रवारचा दिवस (१५ ऑक्टोबर) आयपीएलप्रेमींसाठी खूप मोठा असणार आहे. या दिवशी संध्याकाळी ७.३० वाजता दुबईच्या मैदानावर आयपीएल २०२१ चा अंतिम सामना रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ या सामन्यात आमने सामने असतील. हा सामना जिंकत कोलकाताकडे तिसरे आयपीएल जेतेपद जिंकण्याची तर चेन्नईकडे चौथ्यांदा चषकावर नाव कोरण्याची संधी असेल.
एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाने या हंगामाच्या सुरुवातीपासूनच शानदार खेळ दाखवला आहे. तर कोलकाता संघानेही युएई टप्प्यातील प्रदर्शनाच्या जोरावर हंगामात पुनरागमन करत अंतिम सामना गाठला आहे. त्यांच्या या यशामागे अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यर याचा मोठा वाटा राहिला आहे. आता हाच खेळाडू धोनीच्या चेन्नईचे चौथ्यांदा विजेते बनण्याचे स्वप्न उध्वस्त करू शकतो.
भारतात खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात अय्यरला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु नेट्समधील त्याचे प्रदर्शन पाहता कर्णधार इयॉन मॉर्गनने युएईतील दुसऱ्या टप्प्यात त्याला आजमावण्याचा प्रयत्न केला आणि त्यानेही आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर संघातील आपले स्थान पक्के केले. कोलकाताकडून ९ आयपीएल सामने खेळताना त्याने ४० च्या सरासरीने ३२० धावा कुटल्या आहेत. यात त्याच्या ३ अर्धशतकांचाही समावेश आहे.
इतकेच नव्हे तर, प्लेऑफच्या सामन्यातही त्याने मॅच विनिंग प्रदर्शन करत संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात हातभार लावला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात तर त्याने सामनावीर पुरस्कारही जिंकला होता. या सामन्यात त्याने सलामीला फलंदाजी करताना ४१ चेंडूंमध्ये ५५ धावा केल्या होत्या. ३ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने त्याने ही उपयुक्त खेळी केली होती. फलंदाजीबरोबरच तो गोलंदाजतही तितकाच प्रभावी सिद्ध झाला आहे.
त्यामुळे हा मॅच विनर खेळाडू अंतिम सामन्यात चेन्नईच्या विजयपथातील सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. म्हणून चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला त्याला लवकर बाद करण्याची रणनिती आखावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-