मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात बुधवारी(२१ एप्रिल) डबल हेडर (एकाच दिवशी २ सामने) सामने झाले. बुधवारचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने १८ धावांनी विजय मिळवला आहे.
चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद २२० धावा केल्या आणि कोलकाताला २२१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला १९.१ षटकात सर्वबाद २०२ धावाच करता आल्या.
आंद्रे रसल आणि पॅट कमिन्सची वादळी खेळी
चेन्नईने दिलेल्या २२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाता संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. कोलकाताकडून शुबमन गिल आणि नितीश राणाने सलामीला फलंदाजी केली. मात्र, पहिल्याच षटकात गिल शुन्यावर दीपक चाहरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ राणाला तिसऱ्या षटकात चाहरने यष्टीरक्षक एमएस धोनीकरवी ९ धावांवर झेलबाद केले.
त्यानंतर चाहरने ५ व्या षटकात कोलकाताचा कर्णधार ओएन मॉर्गनला ७ धावांवर आणि सुनील नारायणला ४ धावांवर बाद करत कोलकाताला मोठे धक्के दिले. पाठोपाठ ६ व्या षटकात राहुल त्रिपाठी लुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीवर ८ धावा करुन बाद झाला. त्यावेळी कोलकाताच्या केवळ ३१ धावा झाल्या होत्या.
मात्र, यानंतर आंद्रे रसल आणि दिनेश कार्तिकने चांगला खेळ केला. आंद्र रसलने आक्रमक खेळ करताना २२ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. त्याने कार्तिकसह ८१ धावांची भागीदारी केली. मात्र, १२ व्या षटकात सॅम करनने रसलला त्रिफळाचीत केले. त्याच्यापाठोपाठ १५ व्या षटकात दिनेश कार्तिक २४ चेंडूत ४० धावा करुन लुंगी एन्गिडीच्या चेंडूवर पायचीत झाला. त्यानंतर कमलेश नागरकोटीही शुन्यावर बाद झाला.
मात्र, यानंतरही पॅट कमिन्सने आक्रमक अंदाजात फलंदाजी करताना अर्धशतक केले. त्याने सॅम करनने गोलंदाजी केलेल्या १६ व्या षटकात ४ षटकार आणि १ चौकारासह ३० धावा वसूल केल्या होत्या. पण अखेर दुसऱ्या बाजूने विकेट्स गेल्याने कोलकाताचा डाव २०२ धावांवर संपला. कमिन्स ३४ चेंडूत ६६ धावांची खेळी करुन नाबाद राहिला. त्याने ४ चौकार आणि ६ षटकार या खेळी दरम्यान मारले.
चेन्नईकडून दीपक चाहरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच लुंगी एन्गिडीने ३ विकेट्स घेतल्या आणि सॅम करनने १ विकेट घेतली.
चेन्नईचे कोलकाताला विजयासाठी २२१ धावांचे आव्हान
प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस सलामीला फलंदाजीला उतरले. या दोघांनीही चेन्नईला दमदार सुरुवात करुन देताना वैयक्तिक अर्धशतके झळकावली. ऋतुराजने ३३ चेंडूत त्याचे आयपीएलमधील चौथे अर्धशतक झळकावले. याबरोबरच या दोघांनी सलामीला ११५ धावांची भागीदारीही केली.
मात्र, हे दोघेही कोलकाता संघाला डोकेदुखी ठरत असताना अखेर वरुण चक्रवर्तीने १३ व्या षटकात ऋतुराजला बाद करत तोडली. ऋतुराजने ४२ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ४ षटकार ठोकले. तो बाद झाल्यानंतर तर डू प्लेसिसने ३५ चेंडूत त्याचे आयपीएलमधील १७ वे अर्धशतक झळकावले.
तसेच ऋतुराज बाद झाल्यानंतर मोईन अलीनेही डू प्लेसिसला चांगली साथ दिली. या दोघांमध्येही ५० धावांची भागीदारी झाली. पण आक्रमक खेळणारा मोईन अली २ चौकार आणि २ षटकारांसह १२ चेंडूत २४ धावा करुन सुनील नारायणच्या गोलंदाजीवर १७ व्या षटकात बाद झाला.
त्याच्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्यानेही आक्रमक अंदाजात फलंदाजी केली. मात्र, त्याला १९ व्या षटकात आंद्रे रसलने बाद केले. धोनीने २ चौकार आणि १ षटकारासह ८ चेंडूत १७ धावा केल्या. तोपर्यंत चेन्नईने २०० धावांचा टप्पा पार केला होता.
अखेरच्या षटकात फाफ डू प्लेसिसने सलग २ षटकार मारत चेन्नईची धावसंख्या आणखी वाढवली. मात्र, त्याचे शतक केवळ ५ धावांनी हुकले. तो ९५ धावांवर नाबाद राहिला. त्याने ६० चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकार मारले. रविंद्र जडेजा ६ धावांवर नाबाद राहिला.
चेन्नईने २० षटकात ३ बाद २२० धावा केल्या आणि कोलकाताला २२१ धावांचे आव्हान दिले.
कोलकाताने जिंकली नाणेफेक
या सामन्यात कोलकाता संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी ११ जणांच्या संघात कोलकाताने हरभजन सिंग ऐवजी कमलेश नागरकोटीला तर शाकिब अल हसन ऐवजी सुनील नारायणला संधी दिली आहे. तसेच चेन्नईने या सामन्यासाठी ड्वेन ब्रावोला विश्रांती दिली असून लुंगी एन्गिडीला ११ जणांच्या संघात संधी दिली आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ –
चेन्नई सुपर किंग्स – ऋतूराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), सॅम करन, शार्दुल ठाकूर, लुंगी एन्गिडी, दीपक चाहर.
कोलकाता नाईट रायडर्स – नितीश राणा, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, ओएन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुनील नारायण, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, वरुण चक्रवर्ती, प्रसिद्ध कृष्णा.