---Advertisement---

KKR vs MI : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची अखेरच्या षटकांत कमाल, मुंबईचा कोलकातावर १० धावांनी दणदणीत विजय

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 11:19 PM
---Advertisement---

चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील पाचवा सामना मंगळवारी(१३ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने १० धावांनी विजय मिळवला आहे. या हंगामातील हा त्यांचा पहिलाच विजय आहे.

या सामन्यात मुंबईने कोलकाताला १५३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला २० षटकांत ७ बाद  केवळ १४२ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून नितीश राणाने अर्धशतक केले होते. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांनी स्वस्तात विकेट्स गमावल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

मुंबईकडून राहुल चाहरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तसेच ट्रेंट बोल्टने २ आणि कृणाल पंड्याने १ विकेट घेतली.

अखेरच्या ४ षटकांत मुंबईने दिले केवळ १९ धावा

कोलकाताला शेवटच्या ४ षटकांत ३० धावांची गरज होती. तसेच त्यांच्या हातात ५ विकेट्स शिल्लक होत्या. मात्र, १७ व्या षटकांत जसप्रीत बुमराहने केवळ ८ धावाच दिल्या. त्यानंतर कृणाल पंड्याने टाकलेल्या १८ व्या षटकात दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसलला केवळ ३ धावाच काढता आल्या. १९ व्या षटकातही त्यांना बुमराहविरुद्ध केवळ ४ धावा काढण्यात यश आले. त्यामुळे अखेरच्या षटकात कोलकाताला १५ धावांची गरज होती. पण हे षटकही ट्रेंट बोल्टने उत्तम टाकताना रसलची ९ धावांवर आणि पॅट कमिन्सची शुन्यावर विकेट घेतली. तसेच या षटकात केवळ ४ धावा दिल्या. त्यामुळे कोलकाताला १० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

मधली फळी कोलमडली

गिल बाद झाल्यानंतर कोलकाताची मधली फळी चाहरच्या गोलंदाजीवर ढेपाळली. राहुल त्रिपाठी(५) आणि ओएन मॉर्गन(७) यांना देखील चाहरने स्वस्तात बाद केले. त्यापाठोपाठ चाहरने त्याच्या वैयक्तिक शेवटच्या षटकात अर्धशतकी खेळी करणाऱ्या नितीश राणाला बाद करत आपली चौथी विकेट मिळवली. राणा ४७ चेंडूत ५७ धावा केल्या. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले. १६ व्या षटकात शाकिब अल हसनही ९ धावांवर कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला.

कोलकाताची अर्धशतकी सलामी

मुंबई दिलेल्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कोलकाताकडून शुबमन गिल आणि नितीश राणा सलामीला उतरले होते. या दोघांनीही सुरुवातीपासून काही आक्रमक फटके मारत अर्धशतकी भागीदारी केली. यांची ही भागीदारी तोडण्यात अखेर राहुल चाहरला यश आले. त्याने २४ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ३३ धावा करणाऱ्या शुबमन गिलला ९ व्या षटकात बाद केले. त्यामुळे ७२ धावांची भागीदारी तुटली.

मुंबईचे कोलकाताला १५३ धावांचे आव्हान

या सामन्यात कोलकाता नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले आहे. या आमंत्रणाचा स्विकार करत मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सर्वबाद १५२ धावा केल्या आणि कोलकाताला १५३ धावांचे आव्हान दिले आहे.

मुंबईने १२ षटकांत ३ विकेट्स गमावल्यानंतर असे वाटत होते की रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या(१५) हे डाव सावरतील. मात्र, रोहित ३२ चेंडूत ४३ धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिकही बाद झाला. यानंतर मुंबईने शेवटच्या ५ षटकांत ५ विकेट्स केवळ आंद्रे रसलच्या गोलंदाजीवर गमावले. रसलने कायरन पोलार्ड(५), कृणाल पंड्या(१५), मार्को जेन्सन(०), राहुल चाहर(८) आणि जसप्रीत बुमराह(०) यांना बाद करत मुंबईला १५२ धावांवर रोखले. रसलने केवळ २ षटके गोलंदाजी करताना १५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.

कोलकाताकडून रसल व्यतिरिक्त पॅट कमिन्सने २ विकेट्स, तर प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती आणि शाकिब अल हसनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

सुर्यकुमारचे अर्धशतक 

मुंबईकडून क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्माने सुरुवात केली होती. पण मुंबई संघात लीनच्या ऐवजी संधी मिळालेला डी कॉक २ धावांवरच वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बाद झाला. या विकेटनंतर मात्र, रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरत अर्धशतकी भागीदारी केली. यादरम्यान सुर्यकुमारने त्याचे अर्धशतक पूर्ण केले.

मात्र, शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर ११ व्या षटकात सुर्यकुमार बाद झाला. त्याने ३६ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. त्याच्या पाठोपाठ १२ व्या षटकांत पॅट कमिन्सने ईशान किशनला केवळ १ धावेवर बाद करत मुंबईला तिसरा धक्का दिला.

मुंबईने १२ षटकांत ३ बाद ९१ धावा केल्या.

कोलकाताने जिंकली नाणेफेक 

या सामन्यात कोलकाता संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील दुसरा सामना आहे. कोलकाताने यापूर्वी पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांना ही विजयी लय कायम राखण्याची अपेक्षा असेल. तर मुंबई इंडियन्सने मात्र पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध पराभवाचा सामना केला होता. त्यामुळे ते कोलकाताविरुद्ध विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करतील.

या सामन्यासाठी मुंबई संघात क्विंटन डी कॉकचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे ख्रिस लीनला अंतिम ११ मधील स्थान गमवावे लागेल आहे. तर कोलकाताने आपल्या ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

असे आहेत ११ जणांचे संघ – 

कोलकाता नाईट रायडर्स – नितीश राणा, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, ओएन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, हरभजन सिंग, प्रसिद्धि कृष्णा, वरुण चक्रवर्ती.

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, मार्को जेन्सन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---