शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५४ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने ८६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह कोलकाताने नेटरनरेट चांगला ठेवत प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के केले आहे.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १७१ धावा केल्या आणि राजस्थानला विजयासाठी १७२ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांना अक्षरश: कोलकाताच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले. राजस्थान १६.१ षटकात ८५ धावांवर सर्वबाद झाले.
राजस्थानकडून १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी सुरुवात केली. पण, पहिल्याच षटकात शाकिब अल हसनने यशस्वी जयस्वालचा त्रिफळा उडवला. त्यानंतर तिसऱ्या षटकात कर्णधार संजू सॅमसनला शिवम मावीने ओएन मॉर्गनकडे झेल देण्यास भाग पाडले. सॅमसननं १ धाव केली.
चौथ्या षटकात कोलकाताच्या लॉकी फर्ग्यूसनने दुहेरी धक्के राजस्थानला दिले. त्याने लियाम लिव्हिंगस्टोनला ६ धावांवर आणि अनुज रावतला शुन्यावर माघारी धाडले. ८ व्या षटकात शिवम मावीनेही दोन विकेट्स घेतल्या. त्याने ग्लेन फिलिप्स आणि शिवम दुबेला त्रिफळाचीत केले. फिलिप्सने ८ धावांवर आणि दुबे १८ धावांवर बाद झाला. पाठोपाठ ख्रिस मॉरीस ९ व्या षटकात वरुण चक्रवर्तीविरुद्ध खेळताना पायचीत झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही.
यानंतर राहुल तेवातियाला जयदेव उनाडकटने साथ देण्याचा प्रयत्न केला. पण, जयदेवला लॉकी फर्ग्यूसनने ६ धावांवर १२ व्या षटकात बाद केले. चेतन साकारिया १६ व्या षटकात १ धाव करुन धावबाद झाला. तर १७ व्या षटकात ४४ धावांवर खेळताना राहुल तेवतिया शिवम मावीच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे राजस्थानचा डाव ८५ धावांवर संपला.
कोलकाताकडून शिवम मावीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आणि लॉकी फर्ग्यूसनने ३ विकेट्स घेतल्या. तसेच, शाकिब अल हसन आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी १ विकेट घेतली.
शुबमन गिलचे अर्धशतक
या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोलकाता संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिलने चांगली सुरुवात केली. या दोघांनी अर्धशतकी सलामी दिली. हे दोघेही मैदानात स्थिरावले असतानाच व्यंकटेशला ११ व्या षटकात राहुल तेवतियाने त्रिफळाचीत केले. त्यामुळे ७९ धावांची सलामी भागीदारी तुटली. व्यंकटेश अय्यरने ३८ धावा केल्या.
त्यानंतर गिलला नितीश राणाने आक्रमक फटके मारत साथ देण्याचा प्रयत्न केला. पण तो ५ चेंडूच १२ धावा करुन १२ व्या षटकात ग्लेन फिलिप्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. दरम्यान, गिलने अर्धशतकी खेळी केली. पण अर्धशतक पूर्ण करुन तो १६ व्या षटकात ख्रिस मॉरीसच्या गोलंदाजीवर यशस्वी जयस्वालकडे झेल देऊन बाद झाला. त्याने ४४ चेंडूत ५६ धावा केल्या. नंतर राहुल त्रिपाठीने छोटेखानी २१ धावांची खेळी केली. पण त्याला १८ व्या षटकात चेतन साकारियाने त्रिफळाचीत केले.
अखेर दिनेश कार्तिक आणि कर्णधार ओएन मॉर्गनने नाबाद राहात कोलकाताला २० षटकात १७१ धावांपर्यंत पोहचवले. कार्तिक १४ आणि मॉर्गन १३ धावांवर नाबाद राहिले.
राजस्थानकडून ख्रिस मॉरीस, चेतन साकारिया, राहुल तेवातिया आण ग्लेन फिलिप्सने प्रत्येकी १ विकेट घेतली.
असे आहेत संघ
या सामन्यासाठी कोलकाताने ११ जणांच्या संघात लॉकी फर्ग्युसनला टीम साऊदीऐवजी संधी दिली. तर, राजस्थानने ४ बदल करताना लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस मॉरीस, अनुज रावत आणि जयदेव उनाडकटला संधी दिली.
असे आहेत ११ जणांचे संघ –
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, लियाम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, अनुज रावत, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, राहुल तेवातिया, जयदेव उनाडकट, चेतन साकरिया, मुस्तफिजूर रहमान
कोलकाता नाईट रायडर्स: शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, ओएन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाकिब अल हसन, सुनील नारायण, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती