कोलकाता | आयपीएल एलिमीनेटरमध्ये बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान राॅयल्सचा २५ धावांनी पराभव केला. कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये झालेल्या दुसऱ्या प्ले ऑफ सामन्यात राजस्थानचे आयपीएल २०१८मधील आव्हान संपुष्ठात आले.
याबरोबर अजिंक्य रहाणेचेही एक स्वप्न अधुरेच राहिले आहे. आयपीएलमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, रोहित शर्मा, झहीर खान, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांनी आजपर्यंत आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांचे कर्णधारपद भुषवले आहे.
त्यात केवळ सचिन तेंडूलकर आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संघाने आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. सचिनच्या नेतृत्वाखाली २०१०ला मुंबई उपविजेती ठरली होती तर रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१७ला विजय मिळवला आहे. यावेळी अंतिम सामन्यात संघाला प्रवेश मिळवुन देणारा तिसरा मुंबईकर कर्णधार होण्याची मोठी संधी रहाणेला होती.
परंतू आज झालेल्या पराभवामुळे त्याची ही मोठी संधी हुकली आहे. त्याला आयपीएल सुरु झाली त्यापुर्वी काही दिवस आधी आॅस्टेलियाचा माजी कर्णधार स्टिव स्मिथच्या जागी राजस्थानचे कर्णधार केले होते. बाकी झहीर खान आणि श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणुन आयपीएलमध्ये विशेष चमक दाखवता आली नाही.





