न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभूत झाल्यानंतर टीम इंडियासाठी पुढील मोठं आव्हान आहे ते या महिन्यापासून सुरू होणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका. उभय संघांमध्ये 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेपूर्वी बीसीसीआयनं अनधिकृत कसोटी सामन्याचं आयोजन केलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेची तयारी करण्यासाठी बीसीसीआयनं केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांना पूर्वीच ऑस्ट्रेलियाला पाठवलं होतं. ते सध्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धच्या पाच दिवसीय अनधिकृत कसोटीत भारत ‘अ’ संघाकडून खेळत आहेत. कर्णधार रोहित शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नसल्याच्या बातम्या आहेत. यामुळे त्याच्या जागी सलामीला संघ केएल राहुल किंवा अभिमन्यू ईश्वरन यांना संधी देऊ शकतो. मात्र ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धच्या अनधिकृत कसोटीत हे दोन्ही फलंदाज सपशेल प्लॉप ठरले. यामुळे आता टीम मॅनेजमेंटची चिंता वाढली आहे.
ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धच्या सामन्यात देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेहमी सलामीला येणाऱ्या अभिमन्यू ईश्वरननं भारताच्या डावाची सुरुवात केली. त्याच्यासोबत अनुभवी केएल राहुल सलामीला आला होता. मात्र अभिमन्यूला पहिल्या डावात खातंही उघडता आलं नाही. तर केएल राहुल केवळ चार धावा करून बाद झाला. आता टीम मॅनेजमेंटचा विश्वास जिंकण्यासाठी या दोघांकडे केवळ एकच डाव शिल्लक आहे. साहजिकच या दोघांवर दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करण्याचं दडपण असेल.
या सामन्याच्या पहिल्या डावात यष्टिरक्षक ध्रुव जुरेलनं 80 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्यामुळे त्याची पर्थ कसोटीत खेळण्याची शक्यता वाढली आहे.विशेष म्हणजे, पहिल्या डावात भारताचे इतर सर्व अव्वल फलंदाज दुहेरी आकड्यालाही स्पर्श करू शकले नाहीत. जुरेलनं मात्र त्याच्याकडे ऑस्ट्रेलियातील वेगवान खेळपट्ट्यांवर खेळण्याचं तंत्र असल्याचं दाखवून दिलं आहे. आता टीम मॅनेजमेंट त्याच्यावर विश्वास दाखवते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा –
रणजी सामन्यातील निर्णयावर संतापला ऋतुराज गायकवाड, व्हिडिओ शेअर करून विचारले बोचरे प्रश्न
मुंबई इंडियन्सनं हरमनप्रीतसह 14 खेळाडूंना रिटेन केलं, संपूर्ण लिस्ट जाणून घ्या
मेगा लिलावात आरसीबीनं या 4 खेळाडूंवर हमखास बोली लावावी, एबी डिव्हिलियर्सचा मोलाचा सल्ला