भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने दुसरा वनडे सामना आणि मालिकादेखील गमावली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३८९ धावांची मोठी धावसंख्या रचली होती. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने ९ गडी गमावत ३३८ धावा केल्या. भारताच्या या पराभवानंतर भारतीय उपकर्णधार केएल राहुलने आपल्या गोलंदाजांची पाठराखण केली.
पत्रकारांच्या प्रश्नांना दिली राहुलने उत्तरे
सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा ५१ धावांनी पराभव झाला. सलग दोन सामन्यांतील निराशाजनक पराभवांनंतर भारतीय संघावर टीका केली जात आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत केएल राहुलने भारतीय संघाविषयी विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियामधील वातावरणात गोलंदाजी करण्यात अडचण येत आहे का?
या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, “मी या गोष्टीशी सहमत नाही. ऑस्ट्रेलियातील वातावरण निराळे आहे. टी२० क्रिकेट सोडून आम्ही लगेच वनडे क्रिकेट खेळू लागलोय. आम्हाला लवकरात लवकर या वातावरणाशी जुळवून घ्यावे लागेल. आमचे खेळाडू चुकांमधून शिकत आहेत. मदतगार खेळपट्ट्यांवर आम्हाला चांगला खेळ करावा लागेल.”
फलंदाजांना मोठ्या भागीदाऱ्या कराव्या लागतील
मागील दोन सामन्यातील चुकांबद्दल बोलताना राहुल म्हणाला, “मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नियमित अंतराने गडी बाद करणे महत्त्वाचे असते. त्याशिवाय धावसंख्येला नियंत्रण घालता येत नाही. आम्हाला त्यांचे गडी बाद करण्याचा मंत्र शोधावा लागेल. फलंदाजांनाही ३०-४० धावांपेक्षा अधिकची भागीदारी करावी लागेल. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना येथील परिस्थिती चांगल्याप्रकारे माहित आहे. त्याचा ते पुरेपूर फायदा उठवताना दिसत आहेत.”
बुमराह चॅम्पियन गोलंदाज
जसप्रीत बुमराहच्या फॉर्मविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राहुल म्हणाला, “तो एक चॅम्पियन खेळाडू आहे. तो नेहमी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. बुमराह भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याची गुणवत्ता काय आहे आपण सर्व जाणतो. आम्हाला अपेक्षा आहे की, तो लवकरच आपल्या जुन्या रूपात दिसेल आणि भारतासाठी बळी मिळवेल.”
दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ ३९० धावांचा पाठलाग करत असताना राहुलने एक शानदार खेळी खेळली. राहुलने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना, ६६ चेंडूत ७६ धावा ठोकल्या. यात ४ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ऑस्ट्रेलियाने आम्हाला चित केले’, मालिका गमावल्यानंतर विराटची प्रतिक्रिया
अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ
IND vs AUS : प्रेमासाठी काय पण! भावाने चालू सामन्यात तरूणीला केलं प्रपोज, पाहा तिची प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठे तीन विजय
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज
भारताने ९८८ वनडे सामने खेळले, पण ‘असा’ नकोसा विक्रम पहिल्यांदाच झाला