मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३१ वा सामना मंगळवारी (१९ एप्रिल) पार पडला. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात हा सामना पार पडला. या सामन्यात बेंगलोरने १८ धावांनी विजय मिळवला. पण असे असले तरी, लखनऊचा कर्णधार केएल राहुल याने या सामन्यादरम्यान मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
केएल राहुलने विराट कोहलीला पछाडलं
या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना लखनऊसमोर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊकडून केएल राहुलने २४ चेंडूत ३० धावांची खेळी केली. ही खेळी करताना त्याने टी२० क्रिकेट कारकिर्दीत ६००० धावा पूर्ण केल्या. त्याने हा टप्पा १६६ टी२० डावांत पूर्ण केला (RCB vs LSG).
त्यामुळे केएल राहुल (KL Rahul) आता टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ६००० धावा पूर्ण करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. हा पराक्रम करताना त्याने विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकले आहे. विराटने टी२० क्रिकेटमध्ये १८४ डावांत ६००० धावा पूर्ण केल्या होत्या. केएल राहुलच्या आता टी२० क्रिकेटमध्ये १७९ सामन्यांतील १६६ डावांत ४३.५२ च्या सरासरीने ६००७ धावा पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये त्याच्या ५ शतकांचा आणि ५० अर्धशतकांचा समावेश आहे (Fewest innings to 6000 T20 runs).
टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ६००० धावा करणारे भारतीय फलंदाज
१६६ डाव – केएल राहुल
१८४ डाव – विराट कोहली
२१३ डाव – शिखर धवन
२१७ डाव – सुरेश रैना
२१८ डाव – रोहित शर्मा
२२५ डाव – गौतम गंभीर
बेंगलोरने जिंकला सामना
मंगळवारी झालेल्या सामन्यात बेंगलोरने कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १८१ धावा केल्या होत्या. तसेच लखनऊसमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले होते. लखनऊकडून दुश्मंता चमिरा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या लखनऊकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. पण नियमित अंतराने फलंदाजांनी विकेट्स गमावल्याने लखनऊला २० षटकांत ८ बाद १६३ धावाच करता आल्या. त्यामुळे बेंगलोरने हा सामना १८ धावांनी जिंकला. बेंगलोरकडून जोस हेजलवूडने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा डिविलियर्सच दिनेश कार्तिकचे ३६० डिग्री खेळाडू म्हणत करतो कौतुक, वाचा काय म्हणाला
जेसन होल्डरने रोखलं मॅक्सवेलचं वादळ, सुपरमॅन बनत हवेत घेतला जबराट कॅच; Video पाहाच
आरसीबीचा विजयरथ सुस्साट, लखनऊला १८ धावांनी लोळवले; फाफ आणि हेजलवुड विजयाचे शिल्पकार