भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामाचे उपांत्य फेरीचे सामने सुरू आहेत. यातील पहिला उपांत्य फेरीचा सामना आजपासून (१५ फेब्रुवारी) कर्नाटक विरुद्ध उत्तराखंड यांच्यात खेळला जात आहे. लखनऊमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात उत्तराखंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३५०चा आकडा पार केला आहे. यामध्ये केएल राहुल आणि देवदत्त पड्डीकल यांनी शतकी खेळी केल्या आहेत.
राहुलचे हे प्रथम श्रेणीमधील २५वे शतक ठरले आहे. त्याने उपांत्यपूर्व सामन्यातही शतकी खेळी केली होती. तो उत्तराखंड विरुद्ध २११ चेंडूत १४१ धावा करत बाद झाला. यामध्ये त्याने ११ चौकार आणि ५ षटकार मारले. कर्नाटकला मंयक अग्रवालच्या रुपात पहिला धक्का बसला. तो ५ धावा करत बाद झाला. त्याने भारताकडून कसोटीत २४३ धावांची सर्वोच्च खेळी केली आहे.
पहिली विकेट लवकर गेल्याने राहुलने पुन्हा एकदा संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. या स्पर्धेत त्याने पंजाबविरुद्धच्या महत्वाच्या विजयी सामन्यात ५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर मुंबईविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात १३० धावांची खेळी केली होती.
राहुलची प्रथम श्रेणीतील कामगिरी पाहिली तर त्याने ४४.९०च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत कारकिर्दीत ११८ प्रथम श्रेणी सामन्यांच्या २०६ डावांमध्ये ८७५७ धावा केल्या आहेत.
पड्डीकलने कर्णधारपद भुषवताना २३६ चेंडूत १४८ धावांची खेळी केली आहे. यामध्ये त्याने १६ चौकार आणि २ षटकार मारले. तो सध्या खेळपट्टीवर उपस्थित आहे. त्याच्यासोबत करुण नायर असून तो ३७ धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवसाचे तिसरे सत्र सुरू आहे. त्यामुळे कर्नाटकचे पहिल्या डावात २ बाद ३५५ धावा झाल्या आहेत. उत्तराखंडकडून गोलंदाजीत राहुल आणि मयंकच्या विकेट्स वेगवान गोलंदाज आदित्य रावतने घेतल्या.
या स्पर्धेत कर्नाटकने उपांत्यपूर्व फेरीत ४२ वेळचा रणजी ट्रॉफी विजेता संघ मुंबईला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उत्तराखंडने झारखंडला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली.






