दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात ते भारताविरुद्ध पाच सामन्यांची या टी२० मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना आज (९ जून) खेळला जाणार आहे. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला संध्याकाळी ७ वाजता सुरूवात होणार आहे.
या सामन्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारतीय संघाचे नेतृत्व करणारा केएल राहुल (KL Rahul) दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याजागी रिषभ पंतकडे (Rishabh Pant) संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मालिकेबाहेर पडल्याने निराश झालेल्या राहुलने ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे.
“माझ्यासाठी हे मान्य करणे खूप कठीण आहे, पण मी आजपासून नवीन आव्हानांचा स्वीकार करणार आहे. घरच्या मैदानावर पहिल्यांदा नेतृत्व करण्याची संधी मिळाली पण ते करता न आल्याचे वाईट वाटले आहे. बाहेर असलो तरी संघाला माझा पाठिंबा असणार आहे. मला दर्शविलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. मालिकेसाठी पंत आणि बाकी खेळाडूंना शुभेच्छा,” असे ट्वीट राहुलने पोस्ट केले आहे.
Hard to accept but I begin another challenge today. Gutted not to be leading the side for the first time at home, but the boys have all my support from the sidelines.Heartfelt thanks to all for your support.Wishing Rishabh and the boys all the luck for the series.See you soon🏏💙
— K L Rahul (@klrahul) June 8, 2022
राहुल बरोबरच कुलदीप यादवही संघातून दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. निवड समितीने या दोघांच्या जागी सध्या कोणालाही संघात सामील केले नाही. दोघेही आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीए येथे उपचार घेतील.
राहुलला नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व दिले होते. रोहित, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली आहे. मात्र आता दुखापतीमुळे राहुल या मालिकेस मुकला आहे. तर तो संघात नसल्याने ऋतुराज गायकवाडला भारतीय संघासाठी उत्तम कामगिरी करण्याची संधी आहे.
या मालिकेत संघाचे नेतृत्व करणे ही पंतसाठी एक परिक्षा असणार आहे. तो पहिल्यांदाच भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. यासाठी तो तयार असून बीसीसीआयने दिलेल्या संधीचे त्याने आभार मानले आहे. तसेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केले असल्याचा फायदा होईल असेही त्याने म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ
रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘संजूला संघात आणा’, केएल राहुल बाहेर झाल्याने चाहत्यांकडून मागणीला जोर, ट्विट्सचा पाऊस
‘कर्णधार’ आझम विंडीजला पुरून उरला, खणखणीत शतक ठोकत विराटचा विश्वविक्रम मोडला