मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात मंगळवारी (१९ एप्रिल) ३१ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून पराभवाचा धक्का बसला. डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे पार पडलेल्या या सामन्यात लखनऊला १८ धावांनी पराभव स्विकारावा लागला. त्यातच आता लखनऊचा कर्णधार केएल राहुल आणि अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) ३१ व्या सामन्यात केएल राहुल (KL Rahul) आणि मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) यांनी आयपीएलच्या आचारसंहीतेचा भंग (breaching IPL Code of Conduct) केल्याने त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. मात्र, त्यांच्याकडून नक्की कोणती चूक झाली याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. केएल राहुलला सामना शुल्काच्या २० टक्के दंड आकारण्यात आला आहे.
त्याच्याकडून लेव्हल १ ची चूक झाली असल्याचे आयपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे. तसेच त्याने ही चूक मान्य केली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, याआधीही केएल राहुलला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याबद्दल १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.
तसेच मार्कस स्टॉयनिसनेही लेव्हल १ ची चूक केली असल्याचे मान्य केले आहे. पण त्याला कोणताही दंड ठोठावलेला नाही, मात्र, त्याला समज देण्यात आली आहे. आयपीएलच्या नियमांनुसार आचारसंहीतेचा भंग करण्याच्या लेव्हल १ च्या चूकीसाठी सामनाधिकारी घेतील तो निर्णय अंतिम आणि बंधनकारक असणार आहे.
लखनऊचा तिसरा पराभव
मंगळवारी झालेल्या सामन्यात बेंगलोरने कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १८१ धावा केल्या होत्या. तसेच लखनऊसमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले होते. लखनऊकडून दुश्मंता चमिरा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या लखनऊकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. पण नियमित अंतराने फलंदाजांनी विकेट्स गमावल्याने लखनऊला २० षटकांत ८ बाद १६३ धावाच करता आल्या. त्यामुळे बेंगलोरने हा सामना १८ धावांनी जिंकला. बेंगलोरकडून जोस हेजलवूडने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
लखनऊचा हा सात सामन्यांतील तिसरा पराभव आहे. त्यांनी चार सामने जिंकले असून सध्या गुणतालिकेत ते चौथ्या क्रमांकावर आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
डू प्लेसिस आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ९६ बाद झाला नाही, यापूर्वीही झालंय अगदी असंच, वाचा सविस्तर
केएल राहुल विराटला ठरला सरस! ६००० टी२० धावा करत ‘या’ विक्रमात पटकावला अव्वल क्रमांक