भारतीय क्रिकेटपटूंची गेल्या वर्षभरातील कामगिरी उत्तम झाली आहे. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार असे अनेक खेळाडूंनी मागील एक वर्षात चांगली कामगिरी करून भारताच्या अनेक विजयांमध्ये मोलाचा वाटा उचलला आहे.
पण या दिग्गज खेळाडूंना डावलत विस्डेन इंडिया अल्मनॅक २०१८ च्या सहाव्या आवृत्तीसाठी भारतीय फलंदाज केएल राहुलची ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ साठी निवड झाली आहे.
तसेच भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या सन्मानार्थ विस्डेनच्या सहाव्या आवृत्तीच्या कव्हर पेजवर २०१७ मध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषकातील भारतीय संघाच्या एका आनंदाच्या क्षणाचाही फोटो छापला आहे.
विस्डेनचे संपादक सुरेश मेनन यांनी संपादकीय पानावर विराटच्या खेळाचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की विराट एक यशस्वी आंतराष्ट्रीय आणि भारतीय खेळाडू म्हणून पुढे आला आहे. पण यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील सामन्यांकडे लक्ष केंद्रित केले गेले होते.
तसेच विराट हा आकडेवारीशास्त्रज्ञांना नेहमी आनंद देत असतो. जर त्याने परदेशातही चांगला खेळ केला तर तो इतिहासातही कायमचे नाव करेल.
त्याचबरोबर भारतीय महिला खेळाडू दीप्ती शर्मालाही ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिने महिला विश्वचषक २०१७ मध्ये भारतीय संघातून उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले होते.
तसेच भारताची पहिली महिला सुपरस्टार शांता रंगास्वामी यांना इरापल्ली प्रसन्ना यांच्याबरोबर विस्डेन हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले आहे. याबरोबरच सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये प्रियांक पांचाल, हसन अली आणि तमिम इक्बाल यांनाही स्थान मिळाले आहे.