रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात बुधवारी (२६ मे) कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर आयपीएल २०२२चा एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ ६ विकेट्स गमावत १९३ धावाच करू शकला. परिणामी बेंगलोरने (आरसीबी) १४ धावांनी हा सामना जिंकला. पराभूत लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुल याला मात्र मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशात एका माजी भारतीय क्रिकेटपटूने त्याच्यावर टिकास्त्र डागले.
राहुल जबाबदारी घेण्याच्या लायक नाही
एलिमिनेटर सामन्यानंतर बोलताना माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी केएल राहुलच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उभे केले. ते म्हणाले, “मी कोच असतो तर त्याला तसे खेळू दिले नसते. तो नेतृत्वाची जबाबदारी सांभाळण्यास योग्य खेळाडू नाही. धोनी, विराट, रोहित यांना ही जबाबदारी आवडते. त्यांनी नेहमीच संघाचा प्रमुख फलंदाज आणि कर्णधार अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे. मात्र, राहुल सातत्याने यात अपयशी ठरतोय.”
मांजरेकर पुढे बोलताना म्हणाले,
“राहुलने डोक्यातून ही गोष्ट काढून टाकावी की आपल्याला मॅच जिंकवायची आहे. त्याने फक्त आपल्या खेळाची मजा घ्यावी. ज्या दिवशी तो असे करेल त्या दिवशीपासून त्याच्यात नक्कीच बदल दिसेल. माझे त्याला सांगणे आहे की, तू लांबलचक इनिंग खेळण्यापेक्षा वेगवान इनिंग खेळ. ज्यावेळी राहुल भारतीय संघात खेळतो, त्यावेळी त्याचा स्ट्राईक रेट वाढतो. कारण, तिथे रोहित व विराट प्रमुख फलंदाजाची भूमिका पार पाडतात. त्याची कालची इनिंग थर्ड गिअरची होती.”
एलिमिनेटर सामन्यात २०८ धावांचा पाठलाग करत असताना राहुलने ५८ चेंडूमध्ये ७८ धावांची खेळी केली. आव्हानाच्या मानाने ही खेळी संथ होती, अशी प्रतिक्रिया देत अनेकांनी त्याच्यावर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या-
दीपक हुड्डाचा झेल पकडण्याच्या नादात पोलीस अधिकारी जखमी; व्हिडिओ जोरदार व्हायरल
ऍथलेटिक्समधून भारतासाठी आनंदाची बातमी! मुरली श्रीशंकरची युरोपात सुवर्णउडी
पोलिसवाला की जॉन सीना? एलिमिनेटरमधील हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल