केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली लखनऊ सुपरजायंट्स संघ आयपीएल २०२२मध्ये धडाकेबाज प्रदर्शन करत आहे. नुकतेच त्यांनी रविवारी (२४ एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध हंगामातील ३७वा सामना खेळला आणि ३६ धावांनी विजयही मिळवला. परंतु या सामन्यादरम्यान षटकांची गती कमी राखल्यामुळे लखनऊचा कर्णधार राहुल आणि प्लेइंग इलेव्हनमधील सहभागी सर्व खेळाडूंवर दंड ठोठावण्यात आला आहे. यानंतर राहुलने लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईविरुद्ध षटकांची गती कमी राखण्याची (Slow Over Rate) लखनऊ सुपर जायंट्सची (LSG) ही १५ व्या हंगामातील दुसरी वेळ होती. त्याचमुळे कर्णधार राहुलवर २४ लाखांच्या दंडाची कारवाई झाली आहे. तसेच संघातील अन्य खेळाडूंना ६ लाख रुपयांचा किंवा सामना शुल्काच्या २५ टक्के, जो कमी असेल तो दंड आकारण्यात आला आहे.
केएल राहुलवर (KL Rahul) आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) कारवाई होण्याची तशी ही तिसरी वेळ आहे. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यादरम्यान आचारसंहीतेचा भंग केल्याप्रकरणी देखील सामना शुल्काच्या २० टक्के दंड झाला होता. तसेच मुंबईविरुद्धच्याच आयपीएल २०२२ च्या २६ व्या सामन्यात षटकांची गती कमी राखण्याची चूक केल्यामुळे राहुलवर १२ लाखांचा दंड झाला होता. अशा दंडांना कंटाळलेल्या राहुलने प्रतिक्रिया (KL Rahul On Fines) दिली आहे की, “मला मिळणारे अधिकतर पैसे दंड भरण्यात जातात.”
हेही वाचा- मुंबईविरुद्ध मॅच जिंकली, शतक केलं, तरी केएल राहुलला २४ लाखांचा दंड; वाचा नक्की काय केली चूक
मुंबईविरुद्धच्या शतकी खेळीबद्दल राहुलची प्रतिक्रिया
मुंबईविरुद्ध राहुलने ६२ चेंडू खेळताना नाबाद १०३ धावा (KL Rahul Century) फटकावल्या. या खेळीसाठी त्याने ४ षटकार आणि १२ चौकारही मारले. आपल्या या शानदार खेळीबद्दल बोलताना राहुल म्हणाला की, “आम्ही या सामन्यात परिस्थितीनुसार खेळलो. मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेतला आणि जबाबदारी सांभाळली. अपेक्षा करतो की, मी पुढेही हेच करेन. सुरुवातीला मी विचार केला होता की, चेंडू फक्त व्यवस्थित बॅटवर यावा. वानखेडे स्टेडियमवर माझ्या काही खेळी चांगल्या राहिल्या आहेत, तर काही वाईट. त्यामुळे मी फक्त एक-दोन धावा करण्याच्या प्रयत्नात होतो. परंतु सुदैवाने मी पुढे मोठी खेळी करू शकलो.”
फलंदाजी फळी ठरतेय सकारात्मक बाजू
लखनऊ संघातील फलंदाजीच्या खोलीबद्दल बोलताना राहुल म्हणाला की, “या संघासोबत आम्हाला फलंदाजीत खोली मिळतआहे. आमच्याकडे आठव्या क्रमांकापर्यंत चांगले फलंदाज आहेत. जेसन होल्डर आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. यामुळे आमच्या संघाला आणखी खोली प्राप्त होते आणि फलंदाज मनसोक्त त्यांचा नैसर्गिक खेळ दाखवू शकतात. हेच कारण आहे की, आमच्या फलंदाजांचा स्ट्राईक रेट जास्त आहे.”
“जे संघ आव्हानाचा बचाव करू शकतात आणि पावरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करतात, ते सामना चांगल्या पद्धतीने संपवूही शकतात. हेच संघ आयपीएल ट्रॉफीही जिंकू शकतात. आम्ही मेगा लिलावादरम्यान पूर्णपणे स्पष्ट होतो. मी संघात अधिकतर अष्टपैलू घेऊ इच्छित होतो. असा संघ मिळाल्याने माझे कामही सोपे झाले आहे,” असेही राहुलने पुढे म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पंत म्हणजे यष्टीमागील दुसरा धोनी!’, कुलदीपने कारण सांगत गायले गुणगान
Video: स्म्रीती मंधानाला नाही पटला रनआऊटना नवा नियम, बाद झाल्यानंतर विरोधी संघाशी घातला वाद
इकडे मुंबई इंडियन्स सलग ८ वी मॅच हरली अन् तिकडे रोहितची बाबर आझमशी तुलना सुरू झाली