टी२० विश्वचषकात भारतीय संघाने इंग्लंडला पहिल्या सराव सामन्यात ज्या प्रकारे पराभूत केले ते पाहता असे वाटत आहे की, भारतीय खेळाडू चांगल्या लयीत आहेत आणि संघाची तयारी योग्य दिशेने सुरू आहे. इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. यात केएल राहुलने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याने आत्तापर्यंत यूएईत खेळताना चांगल्या धावा केल्या आहेत.
युएईत राहुलचा डंका
यूएईमध्ये केएल राहुलच्या फलंदाजीने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत यूएईमध्ये आतापर्यंत एकूण २५ टी२० सामने खेळले असून, ज्यात त्याने २४ डावांमध्ये १०८३ धावा केल्या आहेत. यूएईमध्ये त्याची सरासरी ५१.५७ इतकी राहिली आहे आणि त्याने १२९.२३ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. केएल राहुलची यूएईमध्ये टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १३२ धावा अशी आहे. केएल राहुलने २५ सामन्यांत एक शतक आणि सात अर्धशतके लगावली आहेत. या सामन्यांदरम्यान केएल राहुलने एकूण ८५ चौकार आणि ४० षटकार मारले आहेत.
सराव सामन्यात दिसला शानदार फॉर्म
इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात सलामीवीर फलंदाज ईशान किशन आणि केएल राहुल यांनी शानदार खेळी केली. ईशान किशन गेल्या काही सामन्यांमध्ये यूएईमध्ये सातत्याने चांगली फलंदाजी करत असताना, केएल राहुलची दमदार कामगिरी सुरूच राहिली आहे. आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता आणि सराव सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावून आपला दमदार फॉर्म सुरूच ठेवला आहे. केएल राहुलचा यूएईमध्ये फलंदाजीचा खूप चांगला रेकॉर्ड या विश्वचषकात विरोधी संघांसाठी मोठा धोका ठरू शकतो. केएल राहुल चांगल्या लयीत असल्याने, त्याचा फायदा एकंदरीत भारतीय फलंदाजीस होणार आहे. त्याच्या चांगल्या खेळण्याने फलंदाजांवर दबाव येणार नाही आणि भारतीय संघ धावफलकावर अधिकाधिक धावा झळकावू शकेल.
गोलंदाजीत काही समस्या
इंग्लड विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजीत काही कमतरता होत्या. भुवनेश्वर कुमार लयीत दिसला नाही आणि त्याने खूप धावा दिल्या. त्यानंतर राहुल चहर देखील फार प्रभावित करू शकला नाही. मात्र, बुमराह आणि शमीने त्यांचे काम चोख बजावले. आर अश्विनने स्वतःला सिद्ध करून खूप कमी धावा दिल्या. भारतीय संघाला योग्य गोलंदाजांसह साखळी सामन्यांमध्ये उतरणे आवश्यक आहे. भारताला पाकिस्तानविरुद्ध २४ ऑक्टोबर रोजी पहिला साखळी सामना खेळायचा आहे आणि केएल राहुलचा फॉर्म पाकिस्तान संघासाठी मोठा धोका ठरू शकतो.