लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुलने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून इतिहासात आपले नाव कोरले आहे. जो रूटने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी दिली होता. त्याचा पुरेपूर फायदा घेत राहुलने कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी नाबाद 127 धावांची प्रशंसनीय खेळी केली. हे त्याच्या कारकिर्दीतील 6 वे कसोटी शतक आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाने राहुलचे ड्रेसिंग रूममध्ये टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. अगदी हॉटेल स्टाफमधील प्रत्येक व्यक्तीही त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होता. ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर सहकाऱ्यांनीही त्याची पाट थोपटली. बीसीसीआयने या प्रसंगाचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.
क्रिकेटचा मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर प्रत्येक फलंदाजासाठी शतक ठोकणे खास बाब असते. या ऐतिहासिक मैदानावर शतक ठोकणाऱ्या फलंदाजाचे नाव लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डमध्ये नोंदवले जाते.
लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर शतक झळकावणारा राहुल तिसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. विनु मांकड (184 धावा) 1952 मध्ये या ऐतिहासिक मैदानावर शतक झळकावणारे पहिले भारतीय सलामीवीर होते. त्यानंतर तब्बल अडतीस वर्षांनंतर 1990 मध्ये, रवी शास्त्री (100 धावा) हे लॉर्ड्सवर शतक झळकावणारे दुसरे भारतीय सलामीवीर ठरले. त्यानंतर गुरुवारी (12 ऑगस्ट) एकतीस वर्षांनंतर राहुल लॉर्ड्सवर शतक झळकावणारा तिसरा भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला.
https://twitter.com/BCCI/status/1426038301887135750?s=20
राहुल इंग्लंडमध्ये एकपेक्षा जास्त शतक झळकावणारा पाचवा भारतीय सलामीवीर ठरला आहे. राहुलच्या आधी, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, विजय मर्चंट, रवी शास्त्री यांनी सलामीवीर म्हणून इंग्लंडमध्ये एकपेक्षा जास्त शतके करण्याचा विक्रम केलेला आहे. हे शतक राहुलसाठी खास आहे कारण जवळजवळ तीन वर्षानंतर पहिले शतक त्याच्या बॅटमधून आले आहे. यापूर्वी 2018 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीत शतक ठोकले होते.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 3 गडी गमावून 276 धावा केल्या आहेत. सध्या लोकेश राहुल 127 धावांवर नाबाद आहे आणि अजिंक्य रहाणे 1 धावांवर नाबाद आहे. सलामीवीर रोहित शर्माने 83 धावा केल्या आणि कर्णधार विराट कोहली 42 धावांवर बाद झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एकेकाळी विरोधात असणाऱ्या ब्रेंडन मॅक्कलमचा ‘या’ माजी अष्टपैलू खेळाडूला मदतीचा हात; म्हणाला…
कारकिर्दीतील १२ वर्षे झोपेशी लढत राहिला ‘मास्टर ब्लास्टर’, पाहा शेवटी कसा मिळवला तोडगा?