आयुष बदोनी, सध्या हे नाव माहित नाही असा एकही क्रिकेटप्रेमी शोधून सापडणार नाही. आयपीएल सुरू होऊन दीड दशक झाल, या दीड दशकातील तिसऱ्या पिढीचा हा प्रतिभाशाली खेळाडू. युसुफ, जडेजा या पहिल्या पिढीनंतर हार्दिक, बुमराह, गिल, पृथ्वी ही दुसरी पिढी येऊन गेली. आता या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व आयुष बदोनी करतोय.
आयपीएल २०२२ साठी नवीन फ्रेंचाइजींसाठी लिलाव झाला आणि डाय हार्ट क्रिकेट फॅन बिझनेस टायकून संजिव गोयंकांनी ७ हजार कोटींना लखनऊ फ्रेंचायजी विकत घेतली. आधी नाव आणि नंतर जर्सीवरून लखनऊ फ्रेंचायजी भरपूर ट्रोल झाली, पण मेंटर म्हणून बसलेल्या आयपीएल लिजेंड गौतम गंभीरने बांधलेल्या टीमच कौतुक झालं.
लखनऊ सुपरजायंट्स नावाने आयपीएलमध्ये शुभारंभ करणाऱ्या या फ्रेंचायझीने आपली पहिली मॅच खेळली दुसरी नवी टीम गुजरात टायटन्सविरूद्ध. ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आपल्या आयपीएल अध्यायाची सुरूवात करताना लखनऊची सुरुवात एकदम अनपेक्षित झाली. मोहम्मद शमीने अवघ्या साडेचार ओव्हरीत सुपरजायंट्सची दाणादाण उडविली. टॉपचे चार बॅटर्स तिशीत उखडले. त्यावेळी ग्राऊंडवर उतरला आयुष बदोनी. कोणलाही माहित नसलेला आयुष बदोनी.
टीम संकटात सापडली असताना थोडाफार अनुभव असलेला दीपक हुडा पीचवर चिकटला. आपल्या हिटिंगचा त्याने शानदार नमुना सादर केला. पण मन जिंकले ते आयुष बदोनीने. भल्याभल्यांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणाऱ्या जगविख्यात राशिद खानला कोवळ्या आयुषने षटकार मारले. गरज तिथे प्रॉपर क्रिकेट शॉट आणि वेळ पडेल तेव्हा क्रिकेट बुक बाजूला ठेवत इंप्रोवाईस बॅटिंग त्याने केली. आयपीएल पदार्पणातच सणसणीत आणि नजरेत भरेल असे अर्धशतक आयुषने केले. दुसऱ्या सामन्याला समोर आली यशस्वी सीएसके. पुन्हा एकदा आयुषने दम दाखवला. दोन कडकडीत षटकार मारत आपली मॅच फिनिशिंगची काबिलीयत दाखवून दिली. कॅप्टन केएल राहुलने तर घोषणाच करून टाकली, जगासाठी डेवाल्ड ब्रेविस बेबी एबी असेल पण आमचा एबी आयुषच.
आज आयुष सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनला असला तरी, अगदी दोन महिन्यांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. अफाट प्रतिभा असूनही डोमेस्टिकमध्ये त्याला तितकी संधी मिळाली नव्हती. अशात आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये लखनऊ सुपरजायंट्सने त्याच्यावर दाव लावला आणि आयुष बदोनी नाव मेन सर्किटमध्ये आले.
इंडियन क्रिकेटमधील बॅच ऑफ २०१८ म्हणजे शुबमन गिल, पृथ्वी शॉ, रियान पराग, इशान पोरेल अर्थात अंडर १९ वर्ल्डकप जिंकणारी टीम. या टीमचे सिलेक्शन झाले तेव्हा त्यात एक नाव नव्हते ते म्हणजे आयुष बदोनीचे. त्यावेळी या गोष्टीची फारशी चर्चा झाली नाही. पण वर्ल्डकप आधी श्रीलंका टूरवर आशिया कपमध्ये आयुषने तुफान बॅटिंग केली होती, तरीही टीम कॉम्बिनेशनचा विचार करता त्याला डावलले गेले.
वर्ल्डकपसाठी संधी मिळाली नसली तरी, भारतीय क्रिकेटला अनेक हिरे देणाऱ्या राहुल द्रविडने त्याच्या पाठीवर ठेवलेला हात मात्र काढला नाही. आयुष मुळचा दिल्लीचा. आकाश चोप्रा, आशिष नेहरा, रिषभ पंत यांनी क्रिकेटचे क ख ग गिरवले त्या सोनेट क्रिकेट क्लबमध्येच आयुषने क्रिकेटला सुरुवात केलेली, तर अशा या दिल्लीकर आयुषसाठी द्रविडने दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडे शब्द टाकला. हा पुढे सुपरस्टार होईल असे द्रविड त्यावेळी असोसिएशनला म्हणालेला. पण असोसिएशनने त्याचा शब्द कानामागे टाकला, असे रिपोर्ट्स सांगतात.
तसेच रिपोर्ट्स नुसार अशीही माहिती समोर येते की, त्यावेळी दिल्ली क्रिकेट बोर्डात असलेले माजी क्रिकेटपटू अतुल वासन यांनी आयुषला नियमित संधी मिळावी म्हणून वाद घातला. पण निवड समितीने अनुभवी उन्मुक्त चंदला झुकते माप दिले. वासन यांनी आयुषला मुंबई इंडियन्ससाठी ट्रायल द्यायला पाठवले, त्याचा गेमही चांगला झाला. पण २०१८ ला नशिबाने जशी हुलकावणी दिली होती… तशीच हुलकावणी २०२१ आयपीएल वेळी त्याला मिळाली. मुंबई इंडियन्सने त्याच्याऐवजी सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकरला संघात सामील करून घेतले. सलग तिसऱ्या वर्षी आयुष अनसोल्ड गेला.
२०२२ साल मात्र त्याच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आल. लखनऊ फ्रॅंचाईजी आली आणि मेंटर गंभीर तर असिस्टंट कोच दिल्लीकर विजय दहिया बनला. दिल्ली क्रिकेट सर्कलमध्ये चर्चा असलेल्या आयुषला झटपट संघात सामील करून घ्यायची संधी त्यांनी सोडली नाही. स्वतः आयुषही आपल्या या थोड्याफार यशाचे श्रेय या दोघांनाच देतो. समोर राशीद, फर्ग्युसन, धोनी जडेजा असली दिग्गज मंडळी असताना पहिल्या दोन मॅचमध्येच सर्वांना त्याने आपली दखल घेण्यास भाग पाडले.
लहानपणी घराच्या टेरेसवर जागोजागी ठेवलेला दगडांमधून गॅप काढणारा आयुष आज आयपीएलची मैदाने गाजवतोय. त्यामुळेच त्याच्याकडे पाहून अनेक जण म्हणतायेत, आता टीम इंडियाचा पुढचा फिनिशर धोनीनंतर बदोनी.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाचा –
महिला क्रिकेटविश्वात निर्विवाद सत्ता गाजवतायेत ऑस्ट्रेलियाच्या रणरागिणी
अशा तीन घटना, जेव्हा नो-बॉल ठरला भारतीय संघासाठी व्हिलन