---Advertisement---

पंजाबविरुद्ध तीन विकेट्स घेणाऱ्या चेतन सकारियाच्या भावाने ३ महिन्यांपूर्वी केलीये आत्महत्या; वाचा त्याचा संघर्षपूर्ण प्रवास

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 12:35 AM
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातून २३ वर्षीय चेतन सकारिया या खेळाडूने राजस्थान रॉयल्स संघाकडून पदार्पण केले. पदार्पणातच त्याने सर्वांना प्रभावित केले.

त्याने या सामन्यात ४ षटकांत ३१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने निकोलस पूरनचाही अप्रतिम झेल घेतला. त्याला या हंगामासाठी राजस्थानने १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात १ कोटी २० लाखांना खरेदी केले होते. यानंतर त्याचे आयुष्य बदलले. त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

टेनिस क्रिकेट खेळण्यापासून सुरुवात…
सकारिया हा सुरुवातीला टेनिस क्रिकेट खेळायचा. त्यामुळे त्याची क्रिकेट खेळण्याची शैलीही त्यानुसारच बदलत गेली. पण वयाच्या १६ व्या वर्षापासून क्रिकेटचे गंभीरतेने प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याने सौराष्ट्र संघाच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळतानाही चांगली कामगिरी करत लक्ष वेधले होते. त्याच्या कामगिरीमुळे त्याला शिष्यवृत्ती मिळाली आणि तो प्रशिक्षणासाठी एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये दाखल झाला.

शेल्डन जॅक्सनची मिळाली मदत 
सौराष्ट्र संघातील शेल्डन जॅक्सनचाही सकारियाच्या यशात वाटा आहे. जॅक्सनने त्याला त्याचे पहिले शुज घेऊन दिले होते. जॅक्सनने त्याला सांगितले होते की जर सकारियाने त्याला नेटमध्ये बाद केले तर तो त्याला शुज घेऊन देईल. सकारियानेही जॅक्सनला बाद केले. त्यामुळे नंतर जॅक्सनने त्याला शुज घेऊन दिले. जॅक्सन आणि सकारिया चांगले मित्र आहेत.

सकारियाच्या भावाची आत्महत्या 
सकारियासाठी क्रिकेटमधील प्रवास स्वप्नवत झाला असला तरी वैयक्तिक आयुष्यात त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर ३ महिन्यांपूर्वी मोठा दु:खाचा डोंगर कोसळला होता. टेम्पो चालकाचा मुलगा असलेल्या सकारियाच्या कुटुंबाची अर्थिक परिस्थिती फारशी बरी नव्हती. त्यातच त्याच्या वडीलांचे आजारपण वाढले. त्यामुळे सकारिया आणि त्याच्या भावावर कुटुंबाची जबाबदारी होती. तो क्रिकेट खेळण्याबरोबरच त्याच्या मामाला होलसेल स्टेशनरी विक्रीमध्ये मदत करतो.

असे असतानाच याच वर्षाच्या सुरुवातीला तो सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये खेळत असताना त्याच्या धाकट्या भावाने आत्महत्या केली. ज्याचा सकारियावर खोलवर परिणाम झाल्याचे त्याच्या आईने सांगितले.

अराउंड द विकेट.कॉमशी बोलताना त्याची आईने सांगितले की जेव्हा सकारिया सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये खेळत होता, तेव्हा त्याच्या भावाने आत्महत्या केली. पण त्यावेळी त्याच्या कुटुंबाने याबद्दल त्याच्या कामगिरीवर परिणाम होईल, म्हणून पहिले १० दिवस काहीही सांगितले नाही. पण एकदा त्याच्या आईने भावूक होत त्याला त्याच्या भावाच्या आत्महत्येबद्दल सांगितले. त्यानंतर चेतन जवळपास एक आठवड्यासाठी कोणाशीही बोलला नाही, तसेच त्याने काही खाणेही सोडले होते.

आयपीएल कराराने दिला आनंद
या दु:खद घटनेनंतर एक महिन्याने आयपीएल २०२१ लिलावात राजस्थान रॉयल्सने सकारीयावर बोली लावली आणि त्याला संघात सामील करुन घेतले. त्यामुळे सकारीयाचे स्वप्न पूर्ण झाले आणि त्याला एका दृष्टीने अर्थिक सहाय्यही मिळाले. एवढेच नाही तर सकारीयाला राजस्थानच्या पहिल्याच सामन्यात खेळण्याची संधीही मिळाली.

सकारियाची कारकिर्द
सकारियाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये वरिष्ठ सौराष्ट्र संघात २०१८-१९ रणजी ट्रॉफीमधून पदार्पण केले. त्याने १५ प्रथम श्रेणीचे सामने खेळताना ४१ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने ७ अ दर्जाच्या सामन्यांत १० विकेट्स आणि १६ टी२० सामन्यांत २८ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

Video: हा तर केदारच्या पुढचा निघाला! रियान परागने टाकलेला चेंडू पाहून तुम्हीही असेच म्हणाल

कमाल! बेन स्टोक्सने घेतला धोकादायक ख्रिस गेलचा अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ

मोईन अली-तस्लिमा नसरीन प्रकरणानंतर इंग्लिश खेळाडूंचे मोठे पाऊल, सोशल मीडियाचाच करणार बहिष्कार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---