पाच वेळची आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सची आयपीएल २०२२ मध्ये निराशाजनक कामगिरी झाली. मुंबईवर इतकी खराब परिस्थिती आली की मागची पुण्याई, पाच वर्ल्ड क्लास कोच आणि नवी टीम असताना सलग आठ मॅच ते हरले. टीम म्हणून मुंबई कमी पडली तरी, संघाच्या यंग गन्स धडाडल्या. आधी तिलक वर्माने साऱ्यांना इंप्रेस केले आणि आता डेवाल्ड ब्रेविसने. डेवाल्ड ब्रेविस उर्फ बेबी एबी.
पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर आयपीएल २०२२ ची २३ वी मॅच झाली. या वर्षी नव्याने सुरुवात केलेल्या पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचे आव्हान स्विकारले. पहिली बॅटिंग करत पंजाबने मुंबईच्या बॉलर्सची दाणादाण उडवली. १९९ धावांचे टारगेट त्यांनी मुंबईच्या बॅटर्ससमोर ठेवले. सगळ्यांचे आशास्थान कॅप्टन रोहित शर्मा थोडीफार बॅट चालवून माघारी परतला. ईशान किशनच अपयश कायम राहिल. तिसऱ्या नंबरवर बॅटिंगला आला डेवाल्ड ब्रेविस.
तो आयपीएलमधील आपली फक्त तिसरी मॅच खेळत होता. सुरुवातीचे पाच-सहा बॉल त्याने जरा पाहूनन घेतले आणि त्यानंतर दाखवून दिले आपल्याला ‘बेबी एबी’ का म्हणतात. जसा जसा राहुल चाहर बॉलिंग करायला आला तसा तो त्याच्यावर तुटून पडला. राहुल चाहर म्हणजे इंडियाच्या स्पिन बॉलींगमधील जानेमाने नाव. पंजाबच्या तर स्पिन डिपार्टमेंटचा मुख्य गोलंदाजच. दुसऱ्या बॉलला ब्रेविसला स्ट्राइक आली आणि त्याने चौकार मारला. त्यानंतर षटकारांचाच चौका त्याने मारला. सलग चार बॉलला चार षटकार मारत त्याने सर्वांना तोंडात बोटे घालायला लावली. तंतोतंत एबी डिव्हिलियर्स वाटावा अशी त्याची बॅटिंग पाहून सारे जण अवाक् झाले.
ब्रेविसचे ‘बेबी एबी’ नाव जगाला कळले ते याच वर्षीच्या १९ वर्षांखालील विश्वचषकावेळी. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये त्याची बॅटिंग एकदम डीव्हिलियर्ससारखी वाटत होती. इतक्यात त्याने अर्धशतक पूर्ण केले आणि त्यांच्या ड्रेसिंग रूममधून त्याच्याच संघसहकाऱ्याने पोस्टर दाखवला ‘बेबी एबी’. संघात त्याला सारे याच नावाने हाक मारतात. त्याचा प्रत्येक शॉट आपल्याला एबी डीव्हिलियर्सची आठवण करून देतो. बरं तो केवळ डीव्हिलियर्ससारखा खेळतो इतकीच त्यांच्यात समानता नाही. डीव्हिलियर्स ज्या शाळेत शिकला त्याच शाळेचा तोदेखील विद्यार्थी. दोघांचाही जर्सी नंबर १७ च. त्या दोघांमधील बॉंडही इतका मजबूत आहे की, डीव्हिलियर्स त्याला २०२१ पासून मेंटर करतोय.
ऑल टाईम ग्रेटसोबत तुलना होतेय म्हटल्यावर तसा परफॉर्मन्स दाखवणे गरजेचे असते. त्याने तेच केले. १९ वर्षांखालील विश्वचषकामधील त्याची आकडेवारी पाहून तुम्हाला तो नेक्स्ट एबी का आहे, हे समजून जाईल. तो विश्वचषकाच्या सहा मॅच खेळला आणि दोन सेंचुरी आणि तीन हाफ सेंचुरी करत ५०६ धावांचा रतिब त्याने घातला. कितीतरी जुने रेकॉर्ड मोडले आणि नवे रेकॉर्ड या एकाच विश्वचषकामध्ये त्याने बनवले. विश्वचषकामध्ये जगातील जवळपास २५० यंग खेळाडू खेळले. पण टॅलेंटच्या बाबतीत एकही खेळाडू त्याच्या आसपासही दिसला नाही. १९ वर्षांखालील विश्वचषक गाजवल्यानंतर त्याचा नेक्स्ट स्टॉप होता वर्ल्ड बिगेस्ट टी२० लीग आयपीएल.
इनफॉर्म ब्रेविसला आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते. मेगा ऑक्शनमध्ये त्याचे नाव ऐकताच सीएसके आणि पंजाब त्याच्या मागे धावायला लागले. बोली दीड कोटीच्यावर गेली आणि मुंबईने एन्ट्री केली. त्यानंतर तीन कोटीपर्यंत ते मागे हटले नाहीत. अखेर बेबी एबी मुंबईकर झाला.
त्याला जेव्हा आयपीएल डेब्यूची संधी दिली गेली, तेव्हा तो कोणालाही १९ वर्षाचा वाटला नाही. वरूण चक्रवर्तीची मिस्ट्री त्याने पहिल्याच बॉलला सोडवत षटकार मारला. तुफान फॉर्ममध्ये चाललेल्या उमेश यादवला कव्हर्समधून षटकार मारायची ताकत त्याने दाखवली. एकच काय तर, आयपीएलमधील आपला पहिला बॉल टाकताना त्याने चक्क ‘द विराट कोहली’ला एलबीडब्लू केले. त्यानंतर पंजाबविरूद्ध त्याने जो काही विस्फोट केला, त्याने सारेच भारावले.
ब्रेविस ‘बेबी एबी’ म्हणून जरी आपली ओळख तयार करत असला तरी, त्याची स्वतःची छाप तो पाडण्यात यशस्वी ठरतोय. त्याचं टॅलेंट पाहून एक गोष्ट मात्र नक्की म्हणता येईल की, पुढची दोन दशके इंटरनॅशनल आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट सुरक्षित हातात आहे. कारण डेवाल्ड ब्रेविसने दाखवून दिलेय की ‘स्टार इन द मेकिंग’.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
अखंड भारतात चर्चा झालेली मुंगूस बॅट वापरण्यास धोनीने हेडनला दिलेला नकार, वाचा सविस्तर
अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला दमदार पाटीदार, बाऊंड्रीजवळ बटलरने दाखवली जादू