आयपीएलच्या तेराव्या हंगाम रंगतदार सुरु आहे. आत्तापर्यंत झालेल्या २० सामन्यांतच अनेक विक्रम रचले गेले आहेत. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत तरी स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. मोठमोठ्या धावसंख्या लीलया पार केल्या जात आहेत, याच दरम्यान सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या थरारक सामन्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य देखील क्रिकेट चाहत्यांना लाभले आहे.
एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२१ चा विसावा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने निर्धारित २० षटकात १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादनेही ७ विकेट्स गमावत १५९ धावांपर्यंत मजल मारली. परिणामत: सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे हंगामातील पहिली सुपर ओव्हर खेळवली गेली. दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारत सामना खिशात घातला. पण ही सुपर ओव्हर कधीपासून सुरू झाली? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
सुरुवातीला टी२० मध्ये सामना बरोबरीत सुटल्यानंतर, बॉल-आऊट ही फुटबॉलमधील पेनल्टी शूटआउटच्या धर्तीवरील विजेता ठरवण्याची पद्धत वापरली जात. १९९१ काउंटी हंगामात डर्बीशायर विरूद्ध हर्टफोर्डशायर यांच्यातील सामन्यात सर्वप्रथम बॉल-आऊट पद्धतीने निकाल लावण्यात आला. त्यावेळी, पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन चेंडू टाकून यष्ट्या उडवण्यास सांगण्यात आले. डर्बीशायरच्या स्टीव गोल्डस्मिथ यांना एकदा यष्ट्या उडविण्यात यश आले तर इतर गोलंदाज अपयशी ठरले. हर्टफोर्डशायरकडून अँडी निधम व बिल मेरी यांनी यष्ट्यांचा वेध घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
२००६ मध्ये न्युझीलंड विरुद्ध वेस्ट इंडीज या आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रथम बॉल-आऊट पद्धत वापरली गेली. यात न्यूझीलंडने ३-० असा विजय मिळवला. २००७ टी२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा निकाल देखील बॉल-आऊटने लावण्यात आला. ज्यात भारत ३-० अशा फरकाने विजयी झाला.
सुपर ओव्हरमध्ये गेलेला पहिला सामना –
२००८ मध्ये बॉल-आऊटच्या जागी सुपर ओव्हरची सुरुवात आयसीसीतर्फे करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली सुपर ओव्हर न्युझीलंड व वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान २६ डिसेंबर २००८ ला झाली. मुख्य सामना बरोबरीत संपल्यानंतर, ऑककलंडच्या मैदानावर पहिली सुपर ओव्हर सुरू झाली. वेस्ट इंडीजकडून ख्रिस गेल व जेवियर मार्शल ही जोडी मैदानात उतरली. या सुपर ओव्हरमध्ये ख्रिस गेलने न्यूझीलंडच्या डॅनियल व्हेटोरीच्या एका षटकात २५ धावा कुटल्या होत्या. प्रत्युत्तरात, न्युझीलंड फक्त १५ धावा करू शकला. सुलेमान बेनने रॉस टेलर व ब्रेंडन मॅक्यूलम या आक्रमक फलंदाजांना रोखत, आपल्या संघाला विजयी केले.
सुपर ओव्हर खेळण्यासाठी प्रत्येक संघ ३ फलंदाज निवडतो. तर १ गोलंदाज सुपर ओव्हरमधील सर्व ६ चेंडू टाकतो. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या त्या सुपर ओव्हरमध्ये २ विकेट्स गेल्या तर त्यांचा डाव दुसऱ्या विकेट पडल्याबरोब संपतो. नेहमीच्या मर्यादीत षटकांच्या सामन्याप्रमाणेच सुपर ओव्हरमध्येही विजयासाठी प्रथम फलंदाजी केलेल्या संघापेक्षा १ धाव जास्त करण्याचे आव्हान धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला असते. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला गोलंदाजी करताना आपण केलेल्या धावांचे रक्षण करण्याचे आव्हान असते.
२०१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील सुपर ओव्हर –
सुपर ओव्हर या सामन्याचा निकाल लावण्याच्या पद्धतीवर, अनेकदा टीका होत असत. मात्र, २०१९ क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यातील वादानंतर सुपर ओव्हरच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला. अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानंतर, जोस बटलर व बेन स्टोक्स यांनी ट्रेंट बोल्टच्या षटकात १५ धावा काढल्या. न्यूझीलंडला विश्वविजयासाठी जोफ्रा आर्चरच्या विरुद्ध फलंदाजी करताना १६ धावा हव्या होत्या. पण, मार्टिन गप्टिल व जिमी निशाम हे देखील १५ धावाच काढू शकले. अखेरीस, ‘बाउंड्री काउंट’ या नियमानुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. एकदिवसीय क्रिकेटमधील आत्तापर्यंतची ही एकमेव सुपर ओव्हर आहे. पण ती देखील बरोबरीत सुटली. आता नवीन नियमानुसार सुपर ओव्हर देखील बरोबरीत सुटली तर पुन्हा एकदा आणखी एक सुपर ओव्हर खेळवली जाते. तसेच नवीन नियमानुसार जोपर्यंत बरोबरी झालेल्या सामन्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवण्यात येतात.
न्यूझीलंडने खेळल्या सर्वाधिक सुपर ओव्हर
पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत १५ सुपर ओव्हर खेळवल्या गेल्या आहेत. यात न्यूझीलंडने सर्वाधिक ७ सुपर ओव्हर खेळल्या आहेत. दुर्दैवाने, या सर्व सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. इंग्लंडने तीन तर भारत, वेस्ट इंडिज व प्रत्येकी दोन सुपर ओव्हर खेळून सर्वात विजय मिळवला आहे.
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात १३ सुपर ओव्हर झाल्या आहेत. आयपीएलमधील प्रत्येक संघ, कमीत-कमी एक सुपर ओव्हर खेळला आहे. त्यात कोलकाता नाईट रायडर्सने ४ व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी प्रत्येकी ३ सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स एकमेव असा संघ आहे, जो एकदाही सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाला नाही. त्यांनी दोन सामने खेळत, दोन विजय मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
…आणि क्रिकेटविश्वाला पहिली ‘डबल सुपर ओव्हर’ आयपीएलने दिली
गेल्या तीन वर्षात दिल्ली, हैदराबादने खेळल्यात ३ सुपर ओव्हर; पण निकाल मात्र वेगवेगळे, वाचा आकडेवारी
आयपीएल इतिहासात ‘या’ गोलंदाजांनी केली आहे सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिकवेळा गोलंदाजी