आयपीएलच्या नव्या सिझनमध्ये सुरुवातीच्या सामन्यापासूनच प्रत्येक संघासाठी यंग ब्रिगेडने मॅच विनिंग कामगिरी करून दाखवलीय. या क्रिकेटच्या वेगवान प्रकारात याच युवा खेळाडूंना मोठी मागणी असलेली दिसते. खेळाच्या कोणत्याही क्षेत्रात हे खेळाडू आपल्या उर्जेने क्षणार्धात खेळाचा नूर पालटतात. दरवर्षीच अशाप्रकारे अनेक खेळाडू आपली छाप पडताना दिसतात. त्याचवेळी या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे जितक्या वेगाने हे खेळाडू नजरेत भरतात, तितक्याच वेगाने नजरेपासून दूर होतात. याच खेळाडूंना वन सिझन वंडर संबोधले जाते. त्याच वन सिझन वंडरपैकी एक असलेल्या कामरान खानच्या आयुष्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत.
शेन वॉर्नने २००८ ला आपल्या कॅप्टन्सीचा करिष्मा दाखवत. नव्या आणि ताज्या दमाच्या खेळाडूंना हाताशी घेत राजस्थान रॉयल्सला पहिल्यावहिल्या आयपीएलचे चॅम्पियन बनवले. रवींद्र जडेजा, युसुफ पठाण, सिद्धार्थ त्रिवेदी, स्वप्नील अस्नोडकर ही कोणालाही फारशी परिचित नसलेली नावे त्या पहिल्याच सिझननंतर सर्वांच्या तोंडात होती. वॉर्नला क्रिकेटपटू घडवणारा जोहरी म्हटले जाऊ लागले.
आयपीएलच्या पुढच्या सिझनसाठी सर्व फ्रॅंचाईजी तयारी करत होत्या. स्काऊट छोट्या-मोठ्या टूर्नामेंटमध्ये जाऊन टॅलेंट पाहत होते. त्याचवेळी चॅम्पियन राजस्थान रॉयल्सचे स्काऊट मुंबईत एक टूर्नामेंट पाहायला गेले. तिथे त्यांची नजर पडली एका डावखुऱ्या हाताच्या फास्ट बॉलरवर. काटक शरीर, फास्ट बॉलरला हवी तशी उंची अन् खूप सारी एनर्जी. नाव होतं कामरान खान.
आपण आता जरा फ्लॅशबॅकमध्ये जाऊ. हा कामरान मूळचा उत्तर प्रदेशच्या आजमगडचा. वडील लाकडे फोडायचे काम करायचे घरी अठराविश्व दारिद्र्य. त्यात कामरानला नाद भरला क्रिकेटचा तो ट्रायल्सला म्हणून लखनऊ कानपुरला जायचा ट्रायल द्यायला पांढरे किट आणि शूज कंपल्सरी असायचे. कसातरी जुगाड करून त्याने त्याची व्यवस्था केलेली. ज्यावेळी ट्रायल्स द्यायला तो मोठ्या शहरात येत तेव्हा हॉटेलमध्ये राहण्या इतके पैसे त्याच्याकडे कधीच नव्हते यावर सोपा उपाय असायचा रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपणे कमी किमतीत प्लॅटफॉर्म तिकीट काढायचे आणि रात्र त्याच प्लॅटफॉर्मवर घालवायची.
उत्तर प्रदेशात त्याच्यात काही प्रगती होईल आणि संधी मिळेना म्हणून कामरानने मुंबईची वाट धरली तो मुंबईत आला एका कुठल्याशा क्लबसाठी खेळू लागला नेमकी याचवेळी राजस्थान रॉयल्सचे कोचिंग डायरेक्टर डॅरेन बेरी यांनी त्याला पारखले तिथेच त्याला आयपीएल खेळण्याची ऑफर देण्यात आली
अचानक कष्टाचं चीज झालं. ते म्हणतात ना देने वाला जब भी देता, देता छप्पर फाडके असंच काहीसं कामरान राजस्थानच्या कॅम्पमध्ये पोहोचला. इथ त्याने सर्वांवर आपली छाप पाडली. सगळ्यात जास्त इम्प्रेस झाला कॅप्टन शेन वॉर्न. ओह वंडर. फ्युचर. स्लिंगर असे वॉर्नचे शब्द होते. त्याचक्षणी त्याच्याशी करार झाला. पन्नास-शंभर रुपयांसाठी खेळणाऱ्या कामरानचे पहिले कॉन्ट्रॅक्ट होते १२ लाखांचे.
आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सिझनला लिलावाव्यतिरिक्त खेळाडू संघात सामील करता यायचे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अशोक दिंडा. पॉंटिंगला नेट बॉलर म्हणून आलेला दिंडा भावला आणि त्याने आयपीएल डेब्यू केला. असंच काहीसं कामरानसोबत झालं. एकही फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए मॅच न खेळता कामरान आयपीएलमध्ये उतरणार होता.
त्याचवेळी भारतात सार्वत्रिक निवडणुका लागल्या आणि आयपीएलचा संसार दक्षिण आफ्रिकेत थाटावा लागला. राजस्थान आपल्या खिताबाचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरणार होता. संघातच दोन टीम करून मॅच खेळली गेली. या मॅचमध्ये कामरानने जस्टिन ऑंन्टोन्गचा असा काही त्रिफळा उडवला की स्टंपचे दोन तुकडे झाले. आता वॉर्नने चंगच बांधला की काहीही होऊ पोरगं आयपीएल खेळणार म्हणजे खेळणार.
राजस्थान आपल्या मोहिमेची सुरुवात करणार होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध. मॅच आधीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये वॉर्नने धडधडीत नाव घेत म्हटले. कामरान खान या नावावर लक्ष ठेवा. तो भारतीय क्रिकेटचे भविष्य आहे. वॉर्नने त्याचे नामकरणही केले ’टॉरनॅडो’ म्हणजेच वादळ.
मॅचचा दिवस आला अणि दुसरे षटक टाकण्यासाठी वॉर्नने बॉल दिला कामरानच्या हातात. पहिला बॉल टाकण्यासाठी त्याने रनअप घेतला आणि बॉल सोडणार इतक्यात तो घसरला. काहींना हसू फुटले. पण आयुष्यात जो संघर्ष केला होता त्याने त्यांना उभे राहायला शिकविलेले होते. तो पुन्हा उभा राहिला आणि त्या मॅचमध्ये. आपल्या स्पीडने, यॉर्करने, बाऊंसरने त्याने साऱ्यांनाच प्रभावित केले.
पहिल्याच सिझनला कामरान चमकला. आठच सामने त्याला खेळायची संधी मिळाली. त्यात नऊ विकेट्स त्याच्या नावावर जमा झाल्या. त्यापैकी एक होता एमएस धोनी. कामरानचे नाव आयपीएलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. जेव्हा त्याने आयपीएल इतिहासातील पहिली सुपर ओव्हर टाकली.
सारे काही आलबेल असताना त्याच्यावर चकींगचा आरोप झाला. कामरान चेंडू फेकतो असा आरोप त्याच्यावर लागला. आपल्या शिष्यावर असा आरोप लागल्यावर वॉर्न त्याला ऑस्ट्रेलियाला घेऊन गेला. तिथे त्याची ॲक्शन लीगल ठरवली गेली. पण कामरानची धार गायब झाली. पुढच्या सीझनला मोजकेच सामने तो खेळला. यानंतर राजस्थानने त्याची साथ सोडली. नव्याने आयपीएलमध्ये आलेल्या पुणे वॉरियर्स इंडियाने दोन वर्षे त्याला संघात घेतले. पण संधी काही दिली नाही.
आयपीएलमध्ये नाव कमावले म्हणून त्याला उत्तर प्रदेशसाठी दोन फर्स्ट क्लास मॅच खेळायची संधी मिळाली. बस त्यानंतर कामरान खान हे नाव क्रिकेट जगतातून गायब होऊ लागले. अवघ्या तेविसाव्या वर्षी कामरान क्रिकेटच्या मुख्य प्रवाहातून बाजूला झालेला. दुखापतींनी त्याला ग्रासले. एकवेळ भारताचा फ्युचर स्टार म्हणून नावाजलेला कामरान शेतात काम करतानाचे फोटो वायरल झाले. आजही हा कामरान आपलं क्रिकेट बंद नको व्हायला म्हणून टेनिस बॉल क्रिकेट खेळताना दिसतोय. आजही तो लोकांच्या स्मरणात आहे. पण आयपीएलचा ‘वन सिझन वंडर’ म्हणूनच.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाचा –
अरेरे! तब्बल १४०० किमी अंतर कापून धोनीला पाहायला आला होता चाहता, पण झाली निराशा
राजस्थानने लखनऊचा उडवला धुव्वा, २४ धावांनी सामना जिंकत प्लेऑफसाठीचा दावा केला मजबूत