मुल जन्माला आला की, आई-वडील आपल्या पोराला सचिन- धोनी सारखा दिग्गज क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न पाहतात. त्यासाठी मुल हळूहळू वाढत ९-१० वर्षांच्या वयात आलं की, त्याचे आई-वडील त्याला क्रिकेट अकादमीमध्ये भरती करतात. मुल मोठं होत जातं. पुढे देशांतर्गत सामन्यात कमाल करत सर्वांच्या नजरेत आणि मग जगातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या आयपीएलमध्येही साधारण वयाच्या २०-२१ व्या वर्षी पदार्पण करतं. पण असं जरी असलं, तरी असा एक खेळाडू आहे, ज्याने २०-२५ नाही, तर थेट वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये एन्ट्री केली होती. तो खेळाडू म्हणजेच प्रवीण तांबे. कारकीर्द जरी छोटी असली, तरी तो तरुणाईचा प्रेरणास्थान बनला. एवढंच काय तर आता त्याच्या जीवनावर आधारित सिनेमाही आला. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्य योगदान असलेल्या प्रवीण तांबेवर सिनेमा येण्याचं काय कारण? त्याने त्याच्या करिअरमध्ये असं काय केलंय? जाणून घेऊया या लेखातून.
आजपर्यंत अनेक भारतीय खेळाडूंवर चित्रपट बनले गेलेत. यामध्ये एमएस धोनी, एमसी मेरी कॉम, सायना नेहवाल अशा दिग्गजांचा समावेश होतो. आता धोनी आणि मेरीसारखा प्रसिद्ध नसूनही प्रवीण तांबेवर बायोपिक आला हे विशेषच. १ एप्रिलला रिलीज झालेल्या त्याच्या बायोपिकमध्ये मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत काम केलेल्या अभिनेता श्रेयस तळपदेने मुख्य भूमिका साकारली.
प्रवीण तांबे ८ ऑक्टोबर, १९७१ रोजी मुंबईत जन्मला. मुंबई म्हणजे भारतीय क्रिकेटचं माहेरघर. एकापेक्षा एक सरस खेळाडू मुंबई क्रिकेट असोसिएशनने भारतीय क्रिकेटला दिले. मुंबई क्रिकेटचं वर्तुळ इतकं मोठं आहे की, त्यात जितकी नावं प्रसिद्धीझोतात येतात, त्यापैकी कितीतरी पट अधिक नावं समोर येतच नाहीत. यापैकीच एक होता प्रवीण तांबे. प्रवीणचे वडील विजय हे जॉन्सन एंड जॉन्सनसाठी क्रिकेट खेळायचे. वडिलांना पाहून त्याने देखील क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
मुंबईमध्ये कांगा लीग नावाची एक अत्यंत जुनी क्रिकेट स्पर्धा भरते. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही वयाचे खेळाडू खेळू शकतात. भारताचे माजी खेळाडू राहिलेले माधव आपटे हे वयाच्या सत्तरीत कांगा लीगमध्ये खेळायचे. युवा प्रतिभावान खेळाडूंसाठी ही स्पर्धा एक उत्तम व्यासपीठ आहे. प्रवीण देखील या स्पर्धेत खेळायचा. आधी शालेय आणि नंतर महाविद्यालयीन स्तरावर तो क्रिकेट खेळला.
शिक्षण पूर्ण झाल्यावर तो ओरियंट शिपिंग कॉर्पोरेशन या खासगी कंपनीत कामाला लागला. ही कंपनी चांगल्या क्रिकेटपटूंना प्रोत्साहित करायची. कंपनीचा स्वत:चा देखील क्रिकेट संघ होता. प्रवीण या संघात वेगवान गोलंदाज म्हणून खेळायचा. माध्यमांतील वृत्तानुसार असाच एक सामना सुरू असताना, विरोधी संघातील फलंदाज काही केल्या बाद होत नव्हते.
ओरिएंटच्या गोलंदाजांना त्यांनी त्रस्त करून सोडलेले. अशातच ओरियंटचे कर्णधार अजय कदम यांच्या लक्षात आले की, प्रवीण टेनिसबॉल क्रिकेट खेळतो आणि तिथे तो लेगस्पिन गोलंदाजी करतो. त्यांनी प्रवीणला लेगस्पिन गोलंदाजी करायला सांगितले. प्रवीणने कर्णधाराच्या आदेशाचे पालन केले आणि तीन बळी मिळवले. इथूनच सुरू झाला प्रविणचा लेगस्पिनर होण्याचा प्रवास.
ओरिएंट शिपिंग कॉर्पोरेशनला काम करत असतानाच, लग्नाचे वय झाल्याने प्रवीणला घरचे मुली पाहू लागले. आपल्या होणाऱ्या पत्नीला त्याने निक्षून सांगितले होते की, “क्रिकेट कायम माझे पहिले प्रेम राहील. त्यानंतर तुझा आणि कुटुंबाचा क्रमांक लागेल.” आपल्या पतीचे क्रिकेटबद्दलचे प्रेम पाहून पत्नीने देखील प्रवीणला पाठिंबा दिला.
सचिन तेंडुलकरला जेव्हा शेन वॉर्नने त्रस्त केले होते तेव्हा, सचिनला नेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्या मुंबईतल्या उत्कृष्ट लेगस्पिनरमध्ये प्रवीणचा देखील समावेश होता. २००४ मध्ये ओरियंट शिपिंग कंपनी अचानक बंद झाली. त्यामुळे त्याची नोकरी देखील गेली. तेव्हा तो डी. वाय पाटील क्रिकेट अकादमीत दाखल झाला. कांगा लीग व काही मोजक्या स्थानिक स्पर्धा खेळत असलेल्या प्रवीणला मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान मिळत नव्हतं. वयाची तिशी पार देखील झाली होती. मात्र, क्रिकेटबद्दलचे त्याचे प्रेम आणि आणि सराव तसूभरही कमी झाला नव्हता.
पुढे त्याने वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलच्या मैदानात पाऊल टाकले. २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर, काहींनी आपली बुडत असलेली क्रिकेट कारकीर्द सावरली. किशोरवयीन मुलांपासून प्रौढांपर्यंत गुणवत्ता असलेले क्रिकेटपटू आयपीएलमध्ये आपली छाप सोडत असतात. पण, प्रवीण तांबे असाच एक खेळाडू ज्याला कोणीही ओळखत नसताना फक्त आयपीएलमुळे तो क्रिकेटप्रेमींना माहित झाला. अनेकांचे प्रेरणास्थान बनला.
साल २०१३ आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्सचा संघात त्याची निवड झाली. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आपला पहिला सामना खेळताना तो सर्वांना माहीत झाला. आयपीएलमध्ये पदार्पण करतेवेळी त्याचे वय होते ४१ वर्ष ७ महिने. तेव्हा तो आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात वयस्कर खेळाडू, पण त्या हंगामात तो एकच बळी मिळवू शकला.
क्रिकेटप्रेमींना माहीत झालेला प्रवीण खऱ्या अर्थाने जगाला माहित झाला ते त्याच वर्षीच्या चॅम्पियन्स लीगमुळे. राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीपर्यंत तो घेऊन गेला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांचा पुरस्कार देखील त्याने मिळवला. त्या स्पर्धेत ६.५० च्या मामुली सरासरीने त्याने १२ बळी आपल्या नावे केले होते.
चॅपियन्स लीगमधील कामगिरीच्या जोरावर इतक्या वर्षाच्या प्रतिक्षेनंतर त्याची निवड मुंबईच्या रणजी संघात झाली. मुंबईचा वरिष्ठ खेळाडू वसीम जाफरच्या हस्ते त्याला टोपी प्रदान करण्यात आली, तेव्हा त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू कोसळत होते. २०१४ ची आयपीएल त्याच्यासाठी स्वप्नवत राहिली. पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने, १५ बळी मिळवले. यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या हॅट्रिकचा देखील समावेश होता.
तीन वर्ष राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळल्यानंतर, तो गुजरात लायन्स व सनरायझर्स हैदराबाद या संघांसाठी देखील खेळला. २०१७ मध्ये त्याने मुंबईच्या लिस्ट ए व टी२० संघात देखील जागा मिळवली. मुंबई टी२० लीग आणि डी. वाय पाटील मुंबईतील प्रसिद्ध टी-२० स्पर्धांमध्ये तो नियमितपणे सहभागी होत राहिला. दुबईत झालेल्या टी१० लीग स्पर्धेत खेळताना त्याने एकाच षटकात हॅट्रिकसह चार बळी मिळवले. टी१० क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा आणि बळींचे पंचक मिळवणारा पहिला गोलंदाज होण्याचा मान प्रवीणकडे जातो. वयाच्या ४८ व्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सने त्याला २०२० आयपीएलसाठी खरेदी केले. मात्र, भारताबाहेरील व्यवसायिक लीगमध्ये सहभागी झाल्याने तो आयपीएल खेळण्यास पात्र होऊ शकला नाही.
पुढे ऑगस्टमध्ये झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू म्हणून त्याची नोंद झाली. ४८ व्या वर्षी त्याने त्रिनबॅगो नाईट रायडर्सकडून सीपीएल पदार्पण केले होते.
आपल्या खेळाविषयी सांगताना प्रवीण म्हणतो, “लोक कितीही म्हटले की आता खेळणे बस कर, तरी मी ते करणार नाही. मी फक्त आवड नाही, तर माझं आयुष्य म्हणून क्रिकेटकडे पाहतो. ज्या दिवशी मला वाटेल, आता थांबावे तेव्हाच मी व्यवसायिक क्रिकेटला पूर्णविराम देईल.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकापूर्वीच टीम इंडियाची ताकद झाली डबल, ताफ्यात सामील झाले ‘हे’ दोन घातक गोलंदाज
बिहारच्या सौरभ कुमारने 49 रुपयांचे केले 1 कोटी, हार्दिक पंड्याला संघात घेतल्यामुळे चमकले नशीब