कदाचित क्रिकेट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की, पुरुष क्रिकेटपटूच खूप मेहनत घेऊन पुढे येतात आणि जगाच्या पाठीवर आपलं वेगळं स्थान निर्माण करतात. जसे की, विराटने त्याच्या वडिलांचं निधन होऊनही तो मैदानावर आपल्या संघाला खचू दिलं नव्हतं. यातून त्याचं क्रिकेटप्रती असणारं समर्पण १००% दिसतं. पण असं जरी असलं, तरीही भारतीय महिला क्रिकेटरही काही कमी नाहीयेत… त्यांनीही अशा परिस्थितीचा सामना केलाय आणि त्यातून जबरदस्त पुनरागमनही केलंय. भारतीय महिला क्रिकेट संघाची दमदार क्रिकेटर स्नेह राणाची गोष्टही अशीच आहे. राणानेही तिच्या वडिलांना गमावल. पण तिनं न खचता आव्हानांचा सामना केला आणि आपण काय आहोत हे सर्वांना दाखवून दिलं.
स्नेह राणाची कारकीर्द मुळीच सोपी नव्हती. तिला बऱ्याच चढ-उतरांचा सामना करावा लागलाय. १८ फेब्रुवारी, १९९४ रोजी उत्तराखंडच्या, देहराडूनमध्ये स्नेह राणाचा जन्म झाला. तिने लहानपणापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचे उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने घरही सोडलं होतं. तिच्यात शिकण्याची धडपड होती. तिच्यात क्रिकेटचं व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची भूक होती.
स्नेह राणाविषयी काही खास किस्से आहेत, जे तुम्हाला माहिती नसतील. जसे की, ती अवघ्या ९ वर्षांची असताना ती देहराडूनमधील क्रिकेट क्लबमध्ये सहभागी झाली होती. त्याच्या पुढच्याच म्हणजे दहाव्या वर्षी तिनं अलाहाबाद येथे पहिली स्पर्धाही खेळली. तिने क्रिकेटला सुरुवात केली, तेव्हा देहराडूनमध्ये क्रिकेट असोसिएशन नव्हते, पण त्यांच्याकडे अकादमी होत्या आणि त्यात ती सामील झाली.
स्नेह राणा ही भारतीय रेल्वेची अँबेसेडर असून ती २०१५ पासून त्यांचा एक भाग आहे. ती म्हणते की, इतर खेळाडूंसोबत खेळणे आणि ड्रेसिंग रूम शेअर करणे तुम्हाला खूप काही शिकवते. तिच्या प्रशिक्षकांनी स्नेहची प्रतिभा पाहिली आणि तिला चांगल्या सुविधांसाठी इतर राज्यांचा शोध घेण्यास प्रवृत्त केले. हरियाणा हे एक राज्य स्नेहने पाहिले आणि शेवटी पंजाबमध्ये प्रशिक्षणासाठी स्थायिक झाली. “मी लहानपणापासूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मी माझ्या भागातल्या मुलांसोबत गल्ली क्रिकेट खेळायचे. माझ्या शाळेतही मी मुलांसोबत खेळायचे. मुलांच्या गटात मी एकटीच मुलगी असेल,”असे तिने एका मुलाखतीत सांगितले.
त्यानंतर अविरत प्रयत्न केल्यानंतर तिच्या वाट्याला यश हे येणारंच होते. सध्या भारताची गोलंदाजी अष्टपैलू स्नेह राणा आज भारतीय संघाच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. मात्र, उत्तराखंडच्या देहराडूनमधून आलेली स्नेहचे करिअर आणि आयुष्य खूप तणावांनी भरलेले होते. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी म्हणजेच २०१४ साली भारताकडून वनडेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. परंतु, २०१६ नंतर तिला दुखापत झाल्यामुळे संघाबाहेर करण्यात आलं होतं. भारतीय संघातून बाहेर होण्यापूर्वी राणाने केवळ ७ सामने खेळले होते. परंतु तिने धैर्य राखले आणि आपल्या मेहनत व दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात जोरदार पुनरागमन केले.
राणाला जून २०२१ मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी आणि वनडे संघात निवडले गेले होते. या दौऱ्यावरच १६ जून २०२१ रोजी ब्रिस्टलमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यासाठी तिची भारतीय संघाच्या अंतिम एकादशमध्ये निवड झाली होती. या सामन्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय संघाची जर्सी घातल्यानंतर तिने तिच्या दिवंगत वडिलांची आठवण काढत लिहिले होते की, “कदाचित, तुम्ही मला भारतीय कसोटी संघाच्या जर्सीत पाहण्यासाठी आणि या क्षणाला जगण्यासाठी इथे असता.”
दुर्दैवाची बाब अशी की, इंग्लंड दौऱ्यासाठी स्नेह राणाची निवड होण्याच्या २ महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे कसोटी पदार्पणावेळी ती वडिलांच्या आठवणीत भावुक होऊन म्हणाली होती की, “भारतासाठी कसोटी पदार्पण करणे माझ्यासाठी भावनिक क्षण होता. कारण तिचे वडील तिला भारताकडून पुन्हा खेळताना पाहू इच्छित होते.”
स्नेह राणाने राष्ट्रीय संघात पुनरागमन करत आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात अष्टपैलू प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधले होते. तिने या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ८० धावांची नाबाद खेळी करत तो सामना अनिर्णित राखण्यात योगदान दिले होते. त्यावेळी तिने तानिया भाटियासोबत मिळून नवव्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारीही रचली होती. याव्यतिरिक्त तिने पहिल्या डावात ४ विकेट्सही घेतल्या होत्या. कसोटी पदार्पणात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा आणि ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारी राणा पहिली भारतीय आणि एकूण चौथी महिला ठरली होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाचा –
जेव्हा बिग बॉसमध्ये सायमंड्सने केलेलं प्रपोज, चपाती अन् करी बनवायलाही शिकला होता
मोठी बातमी! भारताची सुवर्ण इतिहासाला गवसणी, ७३ वर्षांत पहिल्यांदाच जिंकला ‘थॉमस कप’
खेळाडू मैदानावर बॉल पँटवर का घासतात? जाणून घ्या कारण