भारतातून कोविड मोठ्या प्रमाणात संपला असं २०२२ च्या सुरुवातीला जाहीर केलं गेलं. मात्र, तरीही लोकांच्या गर्दी करण्यावर मर्यादा होत्या. त्यात देशातील सर्वात मोठा उत्सवच बनलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचे बिगुल वाजले. मागील दोन वर्ष युएईत विनाप्रेक्षक झालेली आयपीएल सार्यांनीच पाहिल. मात्र, यावर्षी फॅन्सना स्टेडियममध्ये आणण्याची योजना बीसीसीआयने आखली. त्यालाही मर्यादा होती, कारण दरवर्षीप्रमाणे प्रत्येक संघ आपापल्या शहरात खेळू शकणार नव्हती. त्यामुळे मुंबईतील तीन आणि पुण्याच्या एक अशा चार ग्राउंडवर साखळी फेरी सामने खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. तोही ५०% क्राउड कॅपॅसिटीसह.
चाहत्यांचा उत्साह आणि कोरोनाची संपलेली भीती यामुळे लवकरच पूर्ण क्षमतेने स्टेडियम भरण्यास सरकारने परवानगी दिली. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने देखणे आयोजन केले. लीग स्टेज सुरु असतानाच बीसीसीआयने प्ले ऑफसाठीच्या ठिकाणांची घोषणा केली. एक होते भारतातील सर्वात जुने कोलकात्याचे ईडन गार्ड आणि दुसरे होते जगातील सर्वात नवे क्रिकेट स्टेडियम अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम. अंतिम सामन्याचा मानही नरेंद्र मोदी स्टेडियमलाच.
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून पताका मिरवणाऱ्या याच नरेंद्र मोदी स्टेडियमविषयी आज आपण इत्थंभूत माहिती या बातमीतून घेणार आहोत.
सन १९८२ मध्ये गुजरात सरकारने साबरमती नदीच्या शेजारी मोटेरा या ठिकाणी, १०० एकर जमीन सरदार पटेल यांच्या नावाने स्टेडियम बांधण्यासाठी दिली. गुजरातमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असावे अशी त्यामागील भावना होती. अवघ्या नऊ महिन्यात तिथे एक सुसज्ज आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभे राहिले. सुनील गावसकरांनी १०,००० वी धाव, आणि कपिल पाजींनी रिचर्ड हॅडलीना मागे टाकत ४३२ वी विकेट याच ग्राउंडवर घेतली. २००५ मध्ये ग्राउंडवर फ्लड लाईट बसवण्यात आल्या आणि २००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाच महत्त्वपूर्ण मॅचेसचे यजमानपद त्यांनी भूषविले. १९८७, १९९६ आणि २०११ अशा तीन वर्ल्डकपमधील मॅचेसचे यजमानपद भूषविणार्रा मोजक्या स्टेडियमपैकी एक म्हणजे मोटेरा.
२०१३ मध्ये एकेदिवशी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांनी, आम्ही मोटेराच्या जागी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बांधत असल्याची घोषणा केली. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा व व्हाईस प्रेसिडेंट पिरामल नथवानी यांच्याकडे ही जबाबदारी दिली गेली. २०१५ मध्ये पूर्ण स्टेडियम उद्ध्वस्त करण्यात आले. लार्सन अँड टुब्रोने ६७७ कोटींमध्ये स्टेडियम बांधण्याचे टेंडर मिळवले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. चीफ आर्किटेक होते भारतातील सर्वात सुसज्ज वानखेडे स्टेडियम बांधणारे शशी प्रभू.
दरम्यानच्या काळात नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले. अमित शहा हे देखील दिल्लीत सक्रिय झाले. त्यामुळे स्टेडियमची जबाबदारी शहा यांचे पुत्र, व बीसीसीआय सचिव जय शहा यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. एक भव्यदिव्य स्टेडियम बांधण्यासाठी ते डोळ्यात तेल घालून लक्ष देत होते. अधूनमधून स्टेडियमच्या कामाचे फोटोज व्हायरल होत. त्यावरून स्टेडियमच्या भव्यतेची कल्पना येऊ लागली.
अखेर तो दिवस उजाडला. २४ फेब्रुवारी २०२० रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी स्टेडियम खुले केले गेले. जवळपास दीड लाख लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल.. रेनोवेशननंतर पहिला सामना झाला भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान. त्याचदिवशी सबंध जगाला समजले स्टेडियमचे नामकरण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे केले गेले आहे. तर त्या संपूर्ण क्षेत्राला सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हटले जाईल. ८०० कोटी रुपये खर्चून, जगातील हे सर्वात सुसज्ज स्टेडियम उभे राहिले होते.
या स्टेडियमला जगातील सर्वात मोठे स्टेडियम का म्हणायचे?, याचे उत्तर त्याच्या फॅसिलिटीजमध्ये दिसून येते. एक लाख ३२ हजार प्रेक्षक एकावेळी खुर्च्यांवर बसून, सामन्याचा आनंद घेऊ शकतात. ६३ एकरमधील या स्टेडियममध्ये येण्यासाठी तीन भव्य एन्ट्री पॉईंट उपलब्ध आहेत. येथील सर्वात खास आकर्षण म्हणजे येथे फ्लड लाईट नसून, स्टेडियमच्या छतावर एलईडी लाईट लावल्या गेल्या आहेत. हे जगातील एकमेव असे क्रिकेट स्टेडियम आहे, जेथे चार ड्रेसिंग रूम व ११ सेंटर पिच दिसून येतील. या स्टेडियममध्ये ज्या गोष्टीवर सर्वात जास्त लक्ष दिले गेले ती म्हणजे ड्रेनेज सिस्टिम. कितीही पाऊस झाला तरी, फक्त अर्ध्या तासात ग्राउंड खेळण्यासाठी उपलब्ध होईल, अशी ड्रेनेज सिस्टीम त्यांनी तयार केली आहे.
इतर फॅसिलिटीचा विचार केला तर, ३००० कार आणि १०,००० बाईक आरामात येथे पार्क केल्या जाऊ शकतात. ऑलिंपिक साइज स्विमिंग पूल, बॅडमिंटन, टेनिस आणि स्कॅश कोर्ट देखील येथे उपलब्ध होतील. थिएटर, क्लब हाऊससह ५० रूम्स आणि ७६ कॉर्पोरेट बॉक्स जगातील इतर कोणत्याही स्टेडियमवर पाहायला मिळणार नाही.. या सर्वावर कडी म्हणजे भूकंपाचा कितीही मोठा हादरा बसला तरी, स्टेडियमची एक वीट आणि एक स्क्रू देखील ढिला होणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड राहिलेला डेविड मिलर सगळ्यांनाच पुरून उरला
इंग्लंडच्या युवा गोलंदाजाने फेकला ‘हेल्मेट तोड’ खतरनाक बाऊंसर, व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप
लॉर्ड्स कसोटीत फेल ठरूनही जो रूट बनला ‘विक्रमवीर’, सचिन, द्रविड, कूकच्या खास क्लबमध्ये दाखल