काल (4 मार्च) बीसीसीआयने वरिष्ठ निवड समितीच्या नवीन अध्यक्षाची निवड केली आहे. क्रिकेट सल्लागार समितीने (Cricket Advisory Committee) (सीएसी) माजी फिरकीपटू सुनील जोशी यांना निवड समितीच्या अध्यक्षपदी निवडले आहे. त्यांच्या व्यतिरिक्त माजी मध्यमगती गोलंदाज हरविंदर सिंग यांचीही निवड समीती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांची जागा जोशी तर, निवड समीतीचे माजी सदस्य गगन खोडा यांची जागा हरविंदर सिंग यांना देण्यात आली.
सुनील जोशींचे विराट कोहलीशी जूने नाते –
जोशी यांचे भारताचा कर्णधार विराट कोहलीशी जुने नाते आहे. जोशी यांचा 2008 आणि 2009 च्या आयपीएलसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघात समावेश होता. या संघाचा सध्या कर्णधार असलेला विराट 2008 पासूनच बेंगलोर संघाचा भाग आहे. त्यामुळे विराट आणि जोशी यांची ओळख आधीपासून आहे.
तसेच 2008 -2009 या दरम्यान जोशींनी अवघे 4 आयपीएल सामने खेळले आहेत. ज्यात त्यांना केवळ 1 विकेट मिळवता आली. शिवाय यावेळी त्यांनी 2 डावात एकूण 6 धावा केल्या होत्या.
सुनील जोशींची आंतरराष्ट्रीय कारकिर्द –
जोशी जरी आयपीएलमध्ये चमकू शकले नाहीत. तरी त्यांनी कसोटी आणि वनडे सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. जून 1996मध्ये त्यांनी कसोटीत तर सप्टेंबर 1996मध्ये त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
भारताकडून त्यांनी एकूण 15 कसोटी आणि 69 वनडे सामने खेळले आहेत. यावेळी जोशाींनी कसोटीत 41 आणि वनडेत 69 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्यांनी कसोटीत फलंदाजी करताना 19 डावात 20.70च्या सरासरीने 352 धावा केल्या होत्या. यात एका अर्धशतकाचा समावेश होता. वनडेत फलंदाजी करताना त्यांनी 45 डावात एकूण 584 धावा केल्या होत्या.
त्यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत सर्वात शानदार कामगिरी नैरोबीमध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध 26 सप्टेंबर 1999 वनडे सामना खेळताना केला होता. यावेळी त्यांनी 10 षटके गोलंदाजी करताना 6 निर्धाव षटके टाकली होती. तसेच, 6 धावा देत 5 विकेट्सही घेतल्या होत्या. या सामन्यात जोशींना सामनावीर पुरस्कारही मिळाला होता.
मात्र जोशींना 1999च्या भारतीय विश्वचषक संघात प्रवेश मिळाला नव्हता. अखेर त्यांनी 21 जून 2011 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
प्रशिक्षक म्हणूनही जोशींनी घडवली कारकिर्द –
देशांतर्गत क्रिकेटमध्ये जोशी कर्नाटक संघाकडून खेळले आहेत. क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याबरोबरच जोशी हे प्रशिक्षकही होते. त्यांनी देशांतर्गत संघाव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय संघालाही प्रशिक्षण दिले आहे. ते हैद्राबाद आणि जम्मू-काश्मीर संघाचे प्रशिक्षक होते. तसेच 2016मध्ये त्यांनी आसाम संघाचेही प्रशिक्षण केले होते.
2015 साली जोशी ओमान संघाचे फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक होते. 2017मध्ये त्यांना बांगलादेश संघाचे फिरकी गोलंदाजी सल्लागार म्हणून नेमले होते. 2019मध्ये त्यांना यूएसच्या राष्ट्रीय संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक बनविण्यात आले होते. शिवाय आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब संघासाठीही त्यांनी फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–सेमीफायनलप्रमाणे फायनलही रद्द झाली तर हा संघ जिंकणार विश्वचषक
–वर्ल्डकपची फायनल आणि हरमनप्रीत कौरचा बर्थ डे – घडणार मोठा इतिहास
–विराट कोहलीचा टी२० वर्लडकपच्या फायनलमध्ये पोहचलेल्या टीम इंडियाला खास संदेश