भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळला गेलेला तिसरा टी२० सामना ऑस्ट्रेलियाने १२ धावांनी जिंकला. भारत या सामन्यात पराभूत झाला असला तरी, भारताने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेवर २-१ अशा फरकाने कब्जा केला. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेले १८७ धावांचे लक्ष्य पार करताना, भारतीय कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची खेळी करून एकाकी झुंज दिली. या खेळीदरम्यान विराटने एक नवा विक्रम आपल्या खात्यावर जमा करून घेतला.
ऑस्ट्रेलियाने मिळवला तिसऱ्या सामन्यात विजय
पहिल्या दोन टी२० सामन्यात पराभूत झालेल्या, ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १८६ धावा उभारल्या. ऑस्ट्रेलियाकडून यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने सर्वाधिक ८० धावा केल्या. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक ५४ धावा फटकावून ऑस्ट्रेलियन धावसंख्येला आकार दिला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने २ बळी आपल्या नावे केले. टी नटराजन व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १८७ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. केएल राहुल शून्य धावसंख्येवर दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर, कर्णधार विराट कोहली व शिखर धवन यांनी भारताचा डाव सावरला. मात्र, लेगस्पिनर मिचेल स्वॅपसनने मधल्या षटकांत तीन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करून दिले. कर्णधार विराट व हार्दिक पंड्या यांनी भारताच्या विजयासाठी प्रयत्न केले. परंतु, ते भारताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. अखेर, भारताला १२ धावांनी पराभव पत्करावा लागला.
विराटने कोरले आणखी एका विक्रमावर नाव
या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यातील आपले २५ वे अर्धशतक पूर्ण केले. धावांचा पाठलाग करताना विराटचे हे १७ वे अर्धशतक आहे. विराट पाठोपाठ या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरचा समावेश होतो. वॉर्नरने आतापर्यंत दुसऱ्या डावात १२ अर्धशतके झळकावली आहेत. विराट व वॉर्नरनंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा व आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग हे आहेत. त्यांच्या नावे अनुक्रमे १० व ९ अर्धशतके आहेत.
वनडेत विराटचा नावे आहेत धावांचा पाठलाग करताना २६ शतके
टी२० क्रिकेटमध्ये २५ अर्धशतके झळकावलेल्या विराटने वनडे क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत ४३ शतके ठोकलीत. या ४३ शतकांपैकी २६ शतके धावांचा पाठलाग करताना आली आहेत. टी२०, वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये मिळून विराटच्या नावे ७० शतके जमा आहेत.
संबंधित बातम्या:
– INDvsAUS: स्वेप्सनने वाचवला ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्वीप; तिसऱ्या टी२० सामन्यात भारत १२ धावांनी पराभूत
– दिलदार पंड्या! स्वतःला मिळालेला मालिकावीराचा पुरस्कार दिला नटराजनला
– विराटला बेसबॉलच्या रूपात पाहिलंय का? मेजर बेसबॉल लीगने केला मजेशीर फोटो शेअर