इंग्लंड विरुद्ध भारत संघातील 3 सामन्यांची वनडे मालिका मंगळवारी (17 जुलै) पार पडली. या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (18 जुलै) वनडे क्रमवारी जाहिर केली आहे.
या क्रमवारीत भारताचा चायनामन गोलंदाज कुलदिप यादवने पहिल्यांदाच पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने 8 स्थानांची प्रगती करत 6 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
मात्र गोलंदाजांच्या या क्रमवारीत युजवेंद्र चहलची 2 स्थानांनी घसरण झाली आहे. तो 10 व्या स्थानावर आला आहे. तसेच जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर कायम आहे.
याबरोबरच फलंदाजांच्या क्रमवारीत भारताविरुद्ध सलग दोन वनडेत शतके करणारा जो रुट दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने 14 जुलैला झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात आणि 17 जुलैला झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात अनुक्रमे नाबाद 113 आणि 100 धावा केल्या होत्या.
फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने अव्वल स्थान कायम करताना वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च गुण मिळवले आहेत. त्याचे आता वनडे क्रमवारीत 911 गुण झाले आहेत. त्यामुळे तो सर्वकालीन वनडे क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आला आहे.
सर्वकालीन वनडे फलंदाजी क्रमवारीत त्याने पाकिस्तानच्या जावेद मियाँदादच्या 910 गुणांना मागे टाकले आहे. या यादीत सर विवियन रिचर्डस् 935 गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. तसेच या यादीत पहिल्या 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवणारा विराट एकमेव भारतीय खेळाडू आहे.
त्याचबरोबर आयसीसीने बुधवारी जाहिर केलेल्या वनडे क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत कोणताही बदल झालेला नाही.
तसेच भारताला इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत 2-1 ने पराभव स्विकारावा लागल्याने एक गुण गमवावा लागला आहे. तर इंग्लंडला 1 गुण मिळाला आहे. त्यामुळे इंग्लंने 127 गुणांसह आपले अव्वल स्थान आणखी पक्के केले आहे. तर भारताचे 121 गुणांसह दुसरे स्थान कायम राहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–धोनीच्या या कृत्यांमुळे, निवृत्तीच्या चर्चेने धरला जोर
–इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया जाहिर
–विरेंद्र सेहवागने दिला टीम इंडियाला आधार, ट्विट करुन जिंकली करोडो चाहत्यांची मने