भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अव्वल सेलिब्रिटी ब्रँडच्या यादीत बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानला मागे टाकून अव्वल स्थान मिळवले आहे.
जागतिक मूल्यांकन आणि कॉर्पोरेट फायनान्स सल्लागार असणारे डफ आणि फेल्प्स यांनी भारतातील सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूचा अभ्यास करून ही या वर्षीची क्रमवारी प्रकाशित केली आहे. या रिपोर्टचे नाव “राईज ऑफ द मिलेनिअल्स: इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल सेलिब्रिटी ब्रँड’ असे आहे.
याबद्दल डफ आणि फेल्प्स म्हणाले, कोहली या यादीत १३३ मिलियन डॉलर्स ब्रँड व्हॅल्यू नुसार अव्वल क्रमांकावर आहे. त्याच्या पाठोपाठ अभिनेता शाहरुख खान (१०६ मिलियन डॉलर्स), दीपिका पदुकोण (९३ मिलियन डॉलर्स),अक्षय कुमार (४७ मिलियन डॉलर्स) आणि रणवीर सिंग (४२ मिलियन डॉलर्स) हे आहेत.
डफ आणि फेल्प्स यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि भारत,जपान आणि दक्षिण आशियाचे क्षेत्र अध्यक्ष्य वरुण गुप्ता म्हणाले, “आम्ही जेव्हापासून ही क्रमवारी प्रकाशित करायला लागलो तेव्हापासून पाहिलांदाच शाहरुख खान अव्वल स्थानावरून घसरला आहे.
त्याला विराट कोहलीने मागे टाकले आहे. कोहली हा आता ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या त्यात त्यांना गुंतवून ठेवणाऱ्या ब्रँडसाठी पहिला पर्याय ठरत आहे. हे त्याच्या मैदानातील उत्कृष्ट कामगिरीमुळे आणि मैदानाबाहेरील असणाऱ्या वलयामुळे होत आहे.”
ते पुढे म्हणाले, “कोहली बरोबरच अभिनेत्री आलिया भट, अभिनेता वरुण धवन, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू असे काही तरुण सेलेब्रिटींचीही त्यांच्या क्षेत्रातील चांगल्या कामगिरीमुळे या क्रमवारीत सुधारणा झाली आहे तर काही पहिल्या १५ मध्ये आले आहेत.”
डफ आणि फेल्प्स यांचे संचालक अविरत जैन म्हणाले, ” या क्रमवारीत पहिल्या १५ जणांमध्ये बॉलीवूड सेलेब्रेटींचेच वर्चस्व असले तरी त्यांना खेळाडू चांगली टक्कर देत आहेत. यात कोहली, एम एस धोनी आणि सिंधू आहेत. यांची मिळून किंमत १८० मिलियन डॉलर्स होत आहे. जी पहिल्या १५ सेलिब्रेटींच्या एकूण ब्रँड व्हॅल्यूच्या एक चतुर्थांश आहे.”