मुंबई । भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज आपल्या नावावर आणखी एक विक्रम केला आहे. भारतासाठी दोनशे वनडे सामने खेळणारा तो १४ वा भारतीय खेळाडू बनला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे करणारा तो ७१ वा खेळाडू बनला आहे.
आत्तापर्यंतच्या वनडे कारकिर्दीत विराट कोहलीने १९९ सामन्यात ५५.१३ च्या सरासरीने ८,७६७ केले आहेत. त्यात ३० शतकांचा समावेश आहे तर त्याने ४५ अर्धशतके ही लगावली आहेत.
क्रिकेटचा देवता मानला जाणारा सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची नेहमीच तुलना केली जाते. सर्व क्रिकेट पंडितांचे असे मत आहे की सचिनची तुलना विराटशी करणे चुकीचे आहे. कारण सचिन हा संपूर्ण क्रिकेट खेळणाऱ्या देशांमधील फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. पण जर तुम्ही या दोन्ही फलंदाजांच्या २०० सामन्यानंतरचे आकडेवारी बघितली तर ती आकडेवारी काही वेगळीच गोष्ट सांगते.
२०० वनडे सामन्यानंतर सचिन तेंडुलकरची सरासरी ४१.०७ एवढी होती तर विराट कोहलीची सरासरी ५५ची आहे. सचिनला आपले वनडेतील पहिले शतक बनवण्यासाठी ७१ डाव खेळावे लागले होते तर विराट कोहलीने ८ डावात आपले पहिले शतक केले होते. एवढेच नाही तर सचिन तेंडुलकरने २०० वनडे सामने खेळल्यानंतर ७,३०५ धावा केल्या होत्या तर विराट कोहलीने ८,७७२धावा केल्या आहेत. विराट कोहली सचिनपेक्षा १,४६७ धावांनी पुढे आहे.
फक्त धावांमध्येच नाही तर विराट कोहली हा शतके आणि अर्धशतकांच्या यादीतही सचिनपेक्षा पुढे आहे. सचिने २०० सामन्यानंतर १८ शतके केली होती तर विराटने ३० शतके केली आहेत.
ही झाली सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची तुलना. आता आपण पाहूयात विराटची २०० वनडेनंतर इतरांच्या तुलनेतील कामगिरी…
दोनशे वनडे सामने खेळलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीकडे सर्वाधिक शतके आहेत. विराटने सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धाव केल्या आहेत. या यादीत विराट कोहलीकडे सर्वाधिक सरासरी ही आहे.
या दिग्गजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराटनंतर दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलर्स आहे. एबीने ५४ च्या सरासरीने ८,६२१ धावा केल्या आहेत. विराटनंतर या यादीत सर्वाधिक सरासरी असणारा खेळाडू एबीच आहे.
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, जॅक कॅलिस आणि ब्रायन लारा यांच्यासारख्या दिग्गजांच्या यादीतही विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजेच विराट कोहली हा वनडे इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज बनण्याच्या शर्यतीत आहे.
या वर्षी भारतीय फलंदाजाने वनडे सामन्यांचा मोठा टप्पा पार करण्याची ही पहिली वेळ नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये युवराज सिंगने ३०० वनडे सामन्यांचा टप्पा पार केला होता तर श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत एमएस धोनीनेही ३०० सामन्यांचा टप्पा पार केला होता.