भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ जानेवारी पासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिके आधी दोन दिवसीय सराव सामना रद्द करून सराव शिबिरात भाग घेणे पसंत केले आहे. याबद्दल कर्णधार विराट कोहलीने काल आपली मते मांडली आहेत.
विराटने सराव सामन्यापेक्षा सराव शिबिरात भाग घेण्याच्या निर्णयाला पाठिंबा देताना म्हटले आहे की “सराव सामन्यात दोन दिवस वाया घालवण्यापेक्षा आणि खेळाडूंनी मैदानावर जाऊन जलद अर्धशतके करून परत येण्यापेक्षा, आम्ही आजच्या सारखे आणखी दोन सराव सत्रे करू ज्यामुळे आम्हाला कसोटी क्रिकेटच्या मानसिकतेमध्ये परत येण्यास आणि स्वतःला तपासण्यात मदत मिळेल.”
सराव शिबिरात हवी तशी खेळपट्टी तयार करून सराव करता येऊ शकतो हे सांगताना विराट म्हणाला ” जर आम्ही दोन दिवसीय सराव सामने खेळले तर आम्हाला प्रत्येक दिवशी वेगळी खेळपट्टी मिळणार नाही. सराव शिबिरात आम्हाला ते स्वातंत्र्य मिळते, जिथे आम्ही खेळपट्टीवर आणखी पाणी टाकू, तिच्यावर रोलर फिरवू आणि खेळपट्टीला टणक बनवू ज्यामुळे उद्याच्या सराव सत्राला आल्यावर आम्हाला हवी तशी परिस्थिती असेल.”
विराट पुढे म्हणाला “तुम्हाला हे नक्की माहित नसते की तुम्हाला चांगला सराव सामना मिळेल की नाही. त्यापेक्षा आम्ही सराव शिबिरात भाग घेतला जे आमच्या नियंत्रणाखाली असेल. तुमच्या मनाची जर योग्य तयारी नसेल तर तुम्ही ३ सराव सामने खेळले तरी काही फरक पडत नाही. जर तुमची चांगली मनस्थिती असेल आणि तुम्ही चांगले सराव सत्र केले तरी ते पुरेसे ठरते.”
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ कसोटी, वनडे आणि टी २० मालिका खेळणार आहे.