पुणे: अटीतटीच्या झालेल्या लढतीत कोल्हापूर संघाने पुणे शहर संघाला ५-३ असे पराभूत करताना आझम कॅम्पस येथे मैदानावर सुरु असलेल्या शारदा–गजानन चषक सॉफ्टबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
कोल्हापूर जिल्हा संघाच्या वैष्णवी थोरातने २ होमरन, ऐश्वर्या पुरी, वाणी ताटी व योगेश्वरी शिरगावे यांनी प्रत्येकी १ होमरन करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कोल्हापूर संघाकडून पीचर स्वप्नाली वायदंडेने ७ स्ट्राईकआउट घेताना संघाला विजय मिळवून दिला. पुणे शहर संघाकडून प्रतीक्षा मुरकुटे, प्रीती कांबळे, वैष्णवी चव्हाण यांनी प्रत्येकी १ होमरन केला. पुणे संघाकडून पीचर मोहिनी गरडने १ स्ट्राईकआउट घेतला.
कोल्हापूर जिल्हा संघाच्या करिष्मा कुडचेला सर्वोत्तम खेळाडू या पुरस्काराने गौरविण्यात आले. कोल्हापूर जिल्हा संघाच्या स्वप्नाली वायदंडेला सर्वोत्तम पीचर, पुणे शहर संघाच्या नीती अगरवालला सर्वोत्तम बॅटर, तर पुणे जिल्हा संघाच्या हजरा शेखला सर्वोत्तम कॅचर म्हणून गौरविण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, आमदार मेधा कुलकर्णी, एमसीई सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाच्या (मुली) प्राचार्या आयेशा शेख, महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचे खजिनदार नाजूकराव पखाले, पुणे जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष अण्णा थोरात, पुणे जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गजानन पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलजार शेख यांनी केले.







