काही दिवसांपूर्वीच 18 वर्षीय डी गुकेशनं बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनून इतिहास रचला होता. आता बुद्धिबळपटू कोनेरू हंपीनं पुन्हा एकदा या खेळात भारताचं नाव रोशन केलं आहे. कोनेरू हम्पीनं रॅपिड बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 चं विजेतेपद पटकावलं. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात तिनं इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करून ही ऐतिहासिक कामगिरी केली.
रॅपिड बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावण्याची हम्पीची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी तिनं 2019 मध्ये जॉर्जियामध्ये हे विजेतेपद पटकावलं होतं. या फॉरमॅटमध्ये दोनदा विजेतेपद पटकावणारी कोनेरू हंपी आता चीनच्या जू वेनजुननंतर केवळ दुसरी खेळाडू ठरली आहे.
कोनेरू हंपीचा हा विजय बुद्धिबळाच्या क्षेत्रात भारतासाठी आणखी एक अभिमानाचा क्षण आहे. नुकतेच डी.गुकेशनं क्लासिकल फॉरमॅट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून देशाचं नाव उंचावलं होतं. तो महान विश्वनाथन आनंद नंतर बुद्धिबळात विश्वविजेता बनणार दुसरा भारतीय आहे. विशेष म्हणजे, त्यानं केवळ वयाच्या 18व्या वर्षी ही कामगिरी केली. गुकेशच्या आधी बुद्धिबळात सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा रेकॉर्ड रशियाचे महान गॅरी कॅस्परोव्ह यांच्या नावे होता. त्यांनी वयाच्या 22व्या वर्षी ही कामगिरी केली होती.
37 वर्षीय कोनेरू हंपीनं 11 फेऱ्यांमध्ये एकूण 8.5 गुण मिळवून विजेतेपद पटकावलं. बुद्धिबळातील तिची कारकीर्द चमकदार राहिली आहे. तिनं 2012 मध्ये रशियातील मॉस्को येथे कांस्य पदक आणि 2022 मध्ये उझबेकिस्तानातील समरकंद येथे रौप्य पदक जिंकलं. सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे ती जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू पैकी एक बनली आहे. तिचा हा विजय भारताच्या उदयोन्मुख बुद्धिबळपटूंसाठी एक उदाहरण ठरू शकतो.
हेही वाचा –
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीदरम्यान यष्टिरक्षक फलंदाज जखमी, संपूर्ण मालिकेतून बाहेर
जसप्रीत बुमराहचा कहर, 51 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाची मधली फळी 16 धावांत गडगडली
नक्की कॅप्टन आहे कोण? विराट की रोहित? पाहा व्हिडीओ काय म्हणतोय!