आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव चेन्नई येथे सुरू झालेला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय दिग्गजांनी १० कोटीपेक्षा अधिक रुपयांची बोली मिळवत आतापर्यंत लिलाव वाजवला आहे. हरभजन सिंग व केदार जाधव यांच्यासारख्या भारतीय खेळाडूंच्या पदरी मात्र निराशा पडली. दुसरीकडे कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम याने आश्चर्यकारक किंमत मिळवत लक्ष वेधून घेतले.
या संघाचा भाग झाला गौतम
देशांतर्गत क्रिकेटमधील मोठा अष्टपैलू खेळाडू असलेला कृष्णप्पा गौतम २० लाख रुपयांच्या मूळ किमतीसह या लिलावात सहभागी झाला होता. पंजाब किंग्स व कोलकत्ता नाइट रायडर्स संघानी त्याच्यावर पहिल्यापासून बोली लावण्यास सुरुवात केली. मात्र, ८ कोटी रुपयापर्यंत बोली गेल्यानंतर केकेआर संघाने माघार घेतली. अखेरीस, पंजाबला पछाडत चेन्नई सुपर किंग्सने ९.२५ कोटी रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
आयपीएल इतिहासातील महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला गौतम
सीएसकेने लावलेल्या ९.२५ कोटी रुपयांच्या बोलीसह गौतम आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळता सर्वाधिक रक्कम मिळवणारा खेळाडू ठरला आहे. गौतम देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व करतो. यापूर्वी, गौतमने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स व किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
त्याने याआधी त्याच्या आयपीएल कारकिर्दीत २४ सामने खेळले आहेत. यात त्याने १३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच १८८ धावा त्याने केल्या आहेत.