माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव आजपासून राजकारणात उतरत आहे. (Kedar Jadhav political debut)
तो दुपारी 3 वाजता भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार आहेत. पुण्याचा रहिवासी असलेले 40 वर्षीय केदार जाधव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षात सहभागी होईल. या वेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित असण्याची शक्यता आहे. (Kedar Jadhav joins BJP)
राजकीय इनिंग सुरू करण्याआधी केदार जाधवने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबतही चर्चा केली. त्यावेळीच त्यांच भाजपमध्ये जाणं निश्चित असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
आज त्या चर्चांना पूर्णविराम देत केदार जाधव अधिकृतरित्या भाजपमध्ये सामील होत आहे. आता मैदानावर दमदार फटकेबाजी केलेला हा खेळाडू, राजकारणाच्या मैदानात किती प्रभावी ठरतो, हे पाहणं रंजक ठरेल.
केदार जाधव हा धोनीचा आवडता खेळाडू मानला जातो. त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण धोनीच्या नेतृत्वाखाली झाले. 2014 ते 2020 पर्यंत त्याने भारतासाठी 73 एकदिवसीय आणि नऊ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यात दोन शतके आणि सहा अर्धशतके आहेत, तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तो फक्त एक अर्धशतक करू शकला. 2010 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर, त्याने पाच वेगवेगळ्या संघांसाठी आपली ताकद दाखवली. त्याने 95 आयपीएल सामन्यांपैकी 81 डावात 1208 धावा केल्या.