भारतीय क्रिकेट संघाचा आणि आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचा अष्टपैलू कृणाल पंड्या काही महिन्यांपुर्वी मैदानावरील त्याच्या वागणुकीमुळे चर्चेत आला होता. बडोदा संघाकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळताना संघ सहकारी दीपक हुडासोबतच्या वागणुकीनंतर तो विवादात अडकला होता. आता कृणालची अशीच काहीशी बाजू पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात गुरुवार रोजी (२९ एप्रिल) आयपीएल २०२१ चा २४ वा सामना झाला. या चुरशीच्या लढतीत मुंबईने ७ विकेट्सने विजयी पताका झळकावली. दरम्यान अष्टपैलू कृणालने संघ सहकारी अनुकूल रॉय याच्यासोबत अशोभनीय कृत्य केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
त्याचे झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात १० व्या षटकापर्यंत मुंबई संघ २ बाद ८३ धावा अशा स्थितीत होता. यावेळी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पंड्या किंवा कायरन पोलार्डला न पाठवता कृणालला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले.
कृणालनेही कर्णधाराच्या अपेक्षांवर खरे उतरत २६ चेंडूत २ षटकार आणि २ चौकार मारत ३९ धावा चोपल्या. अखेर १६.४ षटकात मुस्तफिजुर रेहमानने त्याला त्रिफळाचीत केले. दरम्यान पंधराव्या षटकात फलंदाजी करत असताना गोलंदाज राहुल तेवतियाच्या चेंडूवर त्याने एक चोरटी धाव घेतली.
त्यानंतर हात कोरडा झाल्याचे जाणवल्याने त्याने मॉइश्चरायझर (moisturizer) मागवला. यावेळी प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा न मिळालेला फलंदाजी अष्टपैलू अनुकूल मॉइश्चरायझर घेऊन आला. कृणालने ती क्रिम घेऊन हातावर लावली. मग अनुकूलने मॉइश्चरायझरची बॉटल पकडण्यासाठी हात पुढे केला होता, परंतु कृणालने त्याच्याकडे पाहिलेदेखील नाही. त्याने हातातली मॉइश्चरायझरची बॉटल फेकली आणि तो क्रिजकडे निघून गेला.
https://twitter.com/pant_fc/status/1387763190386278401?s=20
आपल्या संघ सहकाऱ्याला अशी न शोभणारी वागणूक दिल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी कृणालच्या हूडासोबतच्या जुन्या वादाचा विषय काढत त्याच्यावर टिका केली आहे.
अनुकूल हा २२ वर्षीय भारतीय क्रिकेटपटू असून २०१९ साली त्याने मुंबई इंडियन्सकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु पदार्पणाच्या सामन्यानंतर त्याला जास्त संधी मिळाली नाही. या सामन्यात त्याने गोलंदाजी करताना ११ धावा देत १ विकेट घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष – ‘हिटमॅन’ अशी ओळख मिळवलेल्या रोहित शर्माबद्दल फारशा माहित नसलेल्या १० गोष्टी