आशिया चषक २०२२ मधील आपला पहिला सामना भारतीय संघ कट्टर प्रतिस्पर्धा पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना दुबईत २८ ऑगस्टला रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने युएईत सरावाला सुरुवातही केली आहे. यादरम्यान असे वृत्त पुढे येत आहे की, भारतीय संघासोबत राखीव खेळाडू म्हणून जोडला गेलेला वेगवान गोलंदाज दीपक चाहर आशिया चषकातून बाहेर झाला आहे. दुखापतीमुळे तो या स्पर्धेला मुकणार आहे. अशात त्याची रिप्लेसमेंट म्हणून वेगवान गोलंदाज कुलदीप सेन याला संघासोबत जोडले जाऊ शकते.
राजस्थान रॉयल्सचा खेळाडू घेऊ शकतो जागा
आशिया चषकापूर्वी (Asia Cup 2022) भारतीय संघाला (Team India) सातत्याने धक्के बसत आहेत. सर्वप्रथम आशिया चषकासाठी संघ घोषित करतानाच बीसीसीआयने खुलासा केला होता की, जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया चषकासाठी अनुपलब्ध असेल. त्यानंतर ऐन आशिया चषकापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे भारतीय संघासोबत युएईला जाऊ शकले नाहीत. यानंतर आता चाहरही (Deepak Chahar) दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर होणार असल्याचे समजत आहे.
चाहरने दुखापतीमुळे ६ महिन्यांनंतर झिम्बाब्वे दौऱ्यातून भारतीय संघात पुनरागमन केले होते. परंतु या दौऱ्यात तो ३ पैकी दोनच सामन्यात खेळला होता. यानंतर आता माध्यमांतील वृत्तांनुसार, चाहर पुन्हा एकदा दुखापतीमुळे आगामी आशिया चषकातून बाहेर होऊ शकतो. अशात आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) प्रतिनिधित्त्व करणारा अनकॅप्ड खेळाडू कुलदीप सेन (Kuldeep Sen) याला त्याच्याजागी संधी दिली जाऊ शकते.
कुलदीप सेनला असा आला मेडन कॉल
वेगवान गोलंदाज कुलदीप सेनचा छोटा भाऊ जगदीप सेनने सांगितले की, “२२ ऑगस्टला बीसीसीआयने कुलदीपशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला त्याचा पासपोर्ट मागितला गेला. मग संध्याकाळीपर्यंत युएईचा व्हीसा आल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य संंघ निवडकर्ता चेतन शर्मा यांनी कुलदीप सेनला कॉल केला आणि आशिया चषकाच्या १८ सदस्यीय संघात सहभागी केल्याची खुशखबरी सांगितली.”
त्यानंतर त्वरित २३ ऑगस्टला कुलदीप सेन प्रयागराजमधून निघाला आणि मुंबईला पोहोचला आहे. तिथे तो भारतीय संघासोबत जोडला गेला असल्याची माहिती आहे.
(दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिले आहेत)
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर ख्रिस लिनला परवानगी मिळाली! आता ‘या’ दोन टी-२० लीगमध्ये घालणार धुमाकूळ
शुबमन गिलने स्वत: नाकारली टीम इंडियाची कॅप्टन्सी! मोठं कारण आलं समोर