आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबाद फलंदाजीचे सर्व रेकॉर्ड मोडण्यासाठी खेळत आहे की काय, असं वाटतंय. त्यांचे खेळाडू फक्त चौकार आणि षटकारांचीच भाषा बोलत आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एकेकाळी सनरायझर्स 400 धावा करते की काय असं वाटत होतं. मात्र त्यांना तसं करण्यापासून रोखलं ते कुलदीप यादवनं!
सनरायझर्स हैदराबादनं दिल्लीविरुद्ध 20 षटकांत 7 गडी गमावून 266 धावा केल्या. आयपीएलमध्ये अरुण जेटली स्टेडियमवरील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादनं 5व्या षटकातच 100 धावांचा टप्पा ओलांडला होता. यासह त्यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडला. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडनं अवघ्या 6 षटकांत 125 धावा केल्या होत्या.
मात्र कुलदीप यादवनं आपल्या स्पेलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात एकूण 3 बळी घेत सामन्याची दिशा बदलून टाकली. कुलदीप यादवनं त्याच्या पहिल्या षटकात 20 धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावरही दडपण होतं. पण जेव्हा तो डावातील 7 वं षटक टाकायला आला तेव्हा त्यानं षटकातील दुसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्माला बाद केलं. अक्षर पटेलनं त्याचा झेल घेतला. अभिषेकनं 12 चेंडूत 46 धावांची खेळी केली. याच षटकातील शेवटच्या चेंडूवर कुलदीपनं एडन मार्करमलाही बाद केलं. अक्षर पटेलनंच त्याची कॅच घेतली. मार्करमला 3 चेंडूत केवळ 1 धाव करता आली. एकेकाळी सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज ज्या वेगानं मारत होते, तेव्हा धावसंख्येचा अंदाज 400च्या पुढे दिसत होता. मात्र कुलदीप यादवच्या फिरकीनं सामन्याला कलाटणी दिली.
ट्रॅव्हिस हेड अजूनही क्रीजवर होता. त्यानं अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. 9व्या जेव्हा षटकात कुलदीप गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्यानं ट्रॅव्हिस हेडला ट्रिस्टन स्टब्सकरवी झेलबाद केलं. हेडने केवळ 32 चेंडूत 82 धावा केल्या. या दरम्यान त्यानं 11 चौकार आणि 6 षटकार लगावले. कुलदीप यादवनं यानंतर नितीश रेड्डीचीही विकेट घेतली. तो 37 धावा करून बाद झाला. कुलदीपनं 4 षटकांत 55 धावा देत 4 बळी घेतले.
सनरायझर्स हैदराबादनं या हंगामात या आधी 20 षटकांत 277 आणि 287 धावा केल्या आहेत. त्यांनी आधी मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 धावा केल्या, जी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या होती. त्यानंतर त्यांनी आरसीबीविरुद्ध 287 धावा ठोकत स्वत:चाच रेकॉर्ड मोडला.
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादच्या फलंदाजांनी मोडले क्रिकेट इतिहासातील सगळे रेकॉर्ड! दिल्लीत घोंगावलं ‘ट्रॅविस हेड’चं वादळ
हैदराबादविरुद्ध ऋषभ पंतनं जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजी करणार; एका क्लिकवर जाणून घ्या प्लेइंग 11