नेपीयर। आज(23 जानेवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 8 विकेट्स विजय मिळवला आहे. तसेच 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने 39 धावांत सर्वाधिक 4 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला आहे.
हा सामना कुलदीपचा न्यूझीलंडमधील पहिलाच वनडे सामना होता. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये पहिलाच सामना खेळताना त्याने लक्षवेधक कामगिरी केली आहे. त्याची ही कामगिरी न्यूझीलंडमध्ये भारतीय गोलंदाजांनी वनडेमध्ये केलेली तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे.
याआधी न्यूझीलंडमध्ये अनिल कुंबळेने 33 धावांत 5 विकेट्स तर जवागल श्रीनाथ यांनी 23 धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या.
याबरोबरच कुलदीपने फक्त न्यूझीलंडमध्येच नाही तर अन्य देशातही उत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
त्याने जेव्हा दक्षिण आफ्रिकेतील पहिला वनडे सामना खेळला होता तेव्हा त्याने 10 षटकात 34 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच इंग्लंडमधील त्याच्या पहिल्या वनडे सामन्यात 10 षटकात 25 धावा देत तब्बल 6 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याने आत्तापर्यंत 6 देशांत गोलंदाजी केली आहे. त्यापैकी 5 देशात पहिल्या सामन्यात खेळताना त्याने 2 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. पण फक्त विंडीजमध्ये खेळताना त्याला पहिल्या वनडेत गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने निकाल लागला नव्हता.
पण त्याच्या पुढील सामन्यात त्याने विंडीज विरुद्ध 3 विकेट्स घेतल्या होत्या.
कुलदीप यादवने या देशात पहिला वनडे सामना खेळताना केलेली गोलंदाजी –
10-0-34-3 – दक्षिण आफ्रिका
10-0-25-6 – इंग्लंड
10-1-39-4 – न्यूझीलंड
10-0-54-2 – ऑस्ट्रेलिया
8.4-1-31-2 – श्रीलंका
महत्त्वाच्या बातम्या-
–न्यूझीलंडमध्ये क्रिकेट सामन्यात लख्ख सुर्यप्रकाशामुळे कर्णधाराने खेळाडूला दिला गाॅगल
–बापरे! असेही एक कारण ज्यामुळे टीम इंडियाचा हा विजय आहे खास
–वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या १० खेळाडूंमध्ये आहे तब्बल ४ भारतीयांचा समावेश