चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी आता जास्त काळ शिल्लक नाही. ही स्पर्धा केवळ दीड महिने दूर आहे. यासाठी प्रत्येक संघाने तयारी सुरू केली आहे. इंग्लंडनं नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपल्या संघाची घोषणा केली. त्याच वेळी भारतीय संघाबाबतही एक मोठी बातमी समोर आली आहे.
वृत्तानुसार, स्टार फिरकीपटू कुलदीप यादव याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळणार नाही, कारण तो अद्याप पूर्णपणे फिट नाही. कुलदीप ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत खेळला होता. त्यानं पहिल्या डावात 3 गडी बाद केले होते. यानंतर पुढच्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. त्यानंतर जेव्हा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा झाली, तेव्हा त्यात कुलदीपचं नाव नव्हतं. कुलदीप यादव दुखापतग्रस्त झाल्यामुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हता.
2024 टी20 विश्वचषकात कुलदीप यादवनं चांगली कामगिरी केली होती. त्यानं 5 सामन्यांमध्ये 10 गडी बाद केले. टीम इंडियाला चॅम्पियन बनविण्यात त्याचं योगदान महत्त्वपूर्ण होतं. गेल्या महिन्यात कुलदीपवर जर्मनीत शस्त्रक्रिया झाली. अद्याप कुलदीपच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयकडून कोणतंही अधिकृत अपडेट मिळालेलं नाही. परंतु असं म्हटलं जात आहे की, या फिरकीपटूनं अद्याप गोलंदाजी सुरू केलेली नाही. या कारणास्तव त्याचं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणं फार कठीण आहे.
‘टेलिग्राफ’च्या अहवालानुसार, कुलदीप यादवनं दुखापतीनंतर अद्याप पुन्हा गोलंदाजी करण्यास सुरवात केलेली नाही. म्हणूनच तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नाही. बीसीसीआयच्या एका सूत्रानं सांगितलं की, “कुलदीप यादव यानं अद्याप गोलंदाजी सुरू केली नाही. इंग्लंड मालिकेपर्यंत तो संघात परत येऊ शकणार नाहीत. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अद्याप वेळ आहे. तो तोपर्यंत पुनरागमन करू शकतो.”
हेही वाचा –
टीम इंडियात नव्या अष्टपैलू खेळाडूची एंट्री, बॉर्डर-गावस्कर मालिकेत अश्विनच्या जागी संधी मिळणार
चाहत्यांचा हर्टब्रेक! मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत बीसीसीआयनं जारी केलं महत्त्वाचं अपडेट
कर्णधार श्रेयस अय्यरने मुंबईची लाज राखली, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघासाठी ठोकला दावा!