मुंबई । भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुढील काही काळ कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी चेंडूला लाळ किंवा थुंकीचा वापर करु नये अशी सूचना केली होती. यावर दिग्गज गोलंदाजांनी आपलं नकारात्मक मत दर्शवलं आहे. चेंडूला चमक आणि ग्रीप पकडण्यासाठी गोलंदाज वारंवार लाल लावताना मैदानावर दिसतात.
लाळेचा वापर करण्यास मनाई होणार असेल तर आयसीसीने यासाठी काही पर्याय सुचवावा अशीही मागणी काही गोलंदाजांनी केली होती. भारताचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव मते, “चेंडूला लाळ लावणे ही लहानपणापासून सवय आहे. ही सवय मोडणे अवघड असल्याचे मत नोंदवले.”
भारताकडून 6 कसोटी आणि 60 वनडे सामने खेळणारा कुलदीप म्हणाला की, “चेंडूला चमक येण्यासाठी सर्वच खेळाडू लहानपणापासून लाळेचा वापर करतात. आता कोरोना व्हायरसमुळे लाळ लावण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. यामुळे गोलंदाजांना गोलंदाजी करणे अवघड जाणार आहे. लाळ लावणे ही सवय आजची नाही तर ती लहानपणापासूनची आहे. सध्या तर मी चेंडूला लाळ न लावता गोलंदाजी करण्याचा सराव करतोय.
“मला आशा आहे की, कोरोना व्हायरसचे संक्रमण समाप्त झाल्यावर क्रिकेट सुरू होईल आणि काही पर्याय समोर येतील. गोलंदाजीचा सराव करताना लहानपणाची सवय मोडण्यासाठी प्रयत्न करतोय. क्रिकेटपटूंना देखील सरकारी दिशानिर्देशाचे पालन करत पुढे गेले पाहिजे.”
तो म्हणाला, मी लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन केले आहे. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने मी सध्या कानपूर येथील लाल बंगला जवळ असलेल्या रोव्हर्स मैदानाजवळ सराव करण्यास सुरुवात केली आहे. प्रशिक्षक कपिल पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी सात ते नऊपर्यंत माझ्या फिटनेसवर मी काम करत आहे. त्यानंतर संध्याकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत गोलंदाजीचा सराव करतोय. क्रिकेट कधी सुरू होईल याची आतुरतेने मी वाट पाहतोय.
25 वर्षीय फिरकीपटूने आयपीएलच्या बाबतीत म्हणाला की, “परिस्थिती पूर्वपदावर आली की आयपीएलचे नियोजन करायला हवे. खेळाडूंच्या दृष्टीने आयपीएल होणे गरजेचे आहे. आम्ही सध्या क्रिकेटच्या बाबतीत जास्त विचार करत नाही. कारण अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. मुंबई, दिल्ली तसेच अन्य शहरात बाधित लोकांची संख्या जास्त आहे. केवळ आपलेच हित पाहून चालणार नाही. इतरांच्या देखील हिताचा विचार करायला हवा. जर परिस्थिती सामान्य झाली तर आयपीएल जरूर व्हावे.”
कुलदीप सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडलेल्या लोकांना काही संस्थेच्या बरोबरीने मदत करत आहे. कुलदीपने भारताकडून खेळताना 6 कसोटी, 60 वनडे, 20 टी ट्वेंटी सामन्यात अनुक्रमे 24, 104, 39 बळी घेतले आहेत.