श्रीलंकेचा माजी महान क्रिकेटपटू कुमार संगकाराने विराट कोहलीबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. विराट कोहली आपला एका वर्षातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम सहज आणि पुन्हा पुन्हा मोडेल असे संगकाराने म्हटले आहे.
एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर आहे. त्याने २०१४मध्ये ४८ सामन्यात ५३.११च्या सरासरीने तब्बल २८६८ धावा केल्या होत्या. एका वर्षांत क्रिकेटच्या इतिहासात केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.
हा विक्रम मोडण्यासाठी विराटला केवळ ५० धावांची गरज होती. परंतु दिल्ली कसोटीत तो ५० धावांवर बाद झाला आणि तो विक्रम अबाधित राहिला.
२०१७मध्ये जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या विराटने यावर्षी ४६ सामन्यात खेळताना ६८.७३च्या सरासरीने तब्बल २८१८ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे विराटचा हा यावर्षीचा शेवटचा सामना होता. श्रीलंका संघाविरुद्ध तो वनडे आणि टी२० मालिकेत भाग घेणार नाही. त्यामुळे हा विक्रम आता संगकाराच्याच नावावर कायम राहील.
याबद्दल एका आकडेवारी तज्ज्ञाने ट्विट करत ही गोष्ट संगकाराच्या ध्यानात आणून दिली की आता हा विक्रम तुझ्याच नावावर असेल. यावर मनाचा मोठेपणा दाखवत सांगकाराने विराटाचे कौतुक तर केलेच शिवाय तो लवकरच हा विक्रम मोडेल असेही म्हटले आहे.
Kumar Sangakkara’s 2868 runs in 2014 will remain as the highest tally ever recorded in a calendar year as Virat Kohli ends year 2017 with 2818 runs #Cricket
— Azzam Ameen (@AzzamAmeen) December 5, 2017
“ज्या प्रकारे विराट फलंदाजी करत आहे ते पाहता हा विक्रम खूप दिवस टिकेल असे मला वाटत नाही. एखादयावेळी पुढच्या वर्षी तो हा विक्रम मोडेल आणि पुढच्या वर्षीही त्याचाच हा विक्रम तोच मोडेल. त्याचा दर्जाच वेगळा आहे. ” असे संगकारा आपल्या ट्विटमध्ये विराटबद्दल गौरवोद्गार काढतो.
I don’t think that will last long the way @imVkohli is batting. He will probably overtake it next year and then do it again the year after. He is a different class.
— Kumar Sangakkara (@KumarSanga2) December 6, 2017