कोलंबो: येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात कुशल मेंडिस हा दिवसात दोन वेळा बाद झाला. आज भारताने श्रीलंकेचा पहिला डाव १८३ धावांत संपुष्ठात आणला.
यामुळे भारताला पहिल्या डावात तब्बल ४९३ धावांची आघाडी मिळाली. भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे पुन्हा फलंदाजीला न येता श्रीलंका संघाला फॉलो-ऑन दिला. त्यामुळे श्रीलंका संघाला पुन्हा फलंदाजीला यावे लागले. काल लंकेचे दोन फलंदाज बाद झाले होते.
कुशल मेंडिस हा आज सकाळी पहिल्या सत्रात १० वाजून २५ मिनिटांनी फलंदाजीला आला मात्र ६४ चेंडू खेळून २४ धावांवर बाद झाला. त्यांनतर लंकेला फॉलो-ऑन मिळाल्यामुळे ते पुन्हा दुसऱ्या डावात फलंदाजीला आले.
परंतु उपुल तरंगाच्या रूपाने त्यांची पहिली विकेट लगेच गेल्यामुळे पुन्हा दुपारी एक वाजता कुशल मेंडिस तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आला. परंतु दुसऱ्या डावात त्याने जबदस्त खेळ करत ११० धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळेच श्रीलंका दुसऱ्या डावात सावरू शकली. परंतु दिवसाखेर ४ वाजून ५० मिनिटांनी तो
दिवसात दुसऱ्यांदा बाद झाला.
कुशल मेंडिसला पहिल्या डावात उमेश यादवने तर दुसऱ्या डावात हार्दिक पंड्याने बाद केले.