पुणे : समस्त गावकरी मंडळी, फुरसुंगी यांच्या वतीने श्री शंभू महादेव उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धेला १०० वर्षापेक्षा मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रासह, दिल्ली, हरियाणामधील नामवंत मल्ल यामध्ये सहभागी होणार आहेत.
शनिवार, दिनांक २४ मार्च रोजी दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शिवशंभो स्टेडीयम फुरसुंगी येथे या निकाली कुस्त्या रंगणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या मल्लांना एकूण ६० लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत विरुद्ध हिंदकेसरी हरियाणाचा परवेश मान, कोल्हापूरचा माऊली जमदाडे विरुद्ध हरियाणाचा अजय गुजर, दिल्लीचा हितेश कुमार विरुद्ध कोल्हापूरचा बालारफीक शेख या कुस्त्या विशेष आकर्षण असणार आहेत.
या कुस्त्यांमधील विजेत्या पैलवानांना चांदीची गदा बक्षिस म्हणून दिली जाणार आहे.
याशिवाय पुण्याचा कौतुक डाफळे विरुद्ध दिल्लीचा प्रविण भोला, पुण्याचा साईनाथ रानवडे विरुद्ध गणेश जगताप, उपमहाराष्ट्र केसरी विकास जाधव विरुद्ध सचिन येलभर या नामवंत मल्लांमध्ये कुस्त्या होणार आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात मोठे निकाली कुस्त्यांचे मैदान म्हणून या स्पर्धेची सर्वदूर ओळख आहे. यानिमित्ताने देशातील तगडया मल्लांचे मल्लयुद्ध अनुभविण्याची संधी कुस्तीप्रेमींना मिळणार आहे.
नामवंत मल्लांच्या कुस्त्यांप्रमाणेच एकूण ६६ कुस्त्या या महाराष्ट्र चॅम्पियन, आॅल इंडिया युनिर्व्हसिटी चॅम्पियन तसेच महाराष्ट्रातील मैदानी कुस्त्यांतील वादळ निर्माण करणा-या मल्लांच्या होतील.