न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू कायले जेमिसन सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काळातून जात आहे. आठवडाभरापूर्वी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा विजय करण्यात त्याचा सिंहाचा वाटा उचलत सामनावीर पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर आता तो इंग्लंडमध्येच ब्लास्ट टी२० ही स्पर्धा खेळत आहे. सरे संघाकडून खेळताना त्याने ग्लॅमॉर्गनविरुद्ध संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, तो केवळ एका धावेने संघाचा पराभव टाळू शकला नाही.
जेमिसनची अष्टपैलू कामगिरी
जेमिसन सध्या इंग्लंडमध्ये राहून ब्लास्ट टी२० या इंग्लंडमधील सर्वात मोठ्या टी२० स्पर्धेत खेळत आहे. तो या स्पर्धेमध्ये सरे काउंटी संघाचे प्रतिनिधीत्व करतोय. मंगळवारी (२९ मे) ग्लॅमॉर्गनविरुद्ध झालेल्या सामन्यात सरे संघाला एका धावेने पराभव पत्करावा लागला. जेमिसनने आक्रमक फटकेबाजी करून विजय दृष्टिपथात आणला होता मात्र तो अखेरच्या चेंडूवर बाद झाल्याने सरेला पराभूत व्हावे लागले.
जेमिसनने प्रथमता आपल्या ४ षटकात २७ धावा देऊन एक गडी बाद केला. ग्लॅमॉर्गन संघाने दिलेले १५४ धावांचे आव्हान पेलताना सरेची अवस्था बिकट झाली होती. मात्र, जेमिसनने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत १५ चेंडूमध्ये तीन चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३१ धावा चोपल्या. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी २ धावांची गरज असताना वॅन डर गुगटेनच्या थेट फेकीवर तो धावबाद झाला आणि संघाला पराभव पत्करावा लागला.
न्यूझीलंडचा विश्वविजयात निभावली भूमिका
आपल्या कारकिर्दीतील केवळ आठवा कसोटी सामना खेळणाऱ्या जेमिसनने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांना अक्षरशः बेजार केले. पहिल्या डावात त्याने पाच बळी घेऊन न्यूझीलंडला सामन्यात पुढे नेले. फलंदाजीतही त्याने झटपट २१ धावा बनविलेल्या. दुसऱ्या डावात भारताचा कर्णधार विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांना पाठोपाठ बाद करत त्याने भारताच्या आव्हानातील हवा काढून टाकली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मी जे दाखवतोय, ते तुम्ही पाहू शकता का? दीपक चाहरच्या प्रश्नावर चाहत्यांनी पाडला प्रतिक्रियांचा पाऊस
बायो बबल तोडणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंना झटका, बोर्डाने सुनावली कठोर शिक्षा
‘सॉरी रो, आता तू इथे सर्वात क्यूट नाहीस’, पत्नी रितिकाने मागितली रोहित शर्माची माफी