साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या द रोज बाऊल स्टेडियमवर आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले आहे. भारताने या आंमत्रणाचा स्विकार करत शनिवारी (१९ जून) चांगली फलंदाजी केली होती. त्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा मोठा वाटा होता. मात्र रविवारी, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्यांना खास काही करता आले नाही.
विराट आणि रहाणेने दुसऱ्या दिवशी अर्धशतकी भागीदारी करत भारताला भक्कम स्थितीत उभे केले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी विराट एकही धाव जास्तीची न जोडताच माघारी परतला.
रविवारी भारताने पहिल्या डावात ३ बाद १४६ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. यावेळी विराट आणि रहाणेने सावध सुरुवात केली होती. पण ६८ व्या षटकात काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर विराट पायचीत झाला. विराटने लगेचच रिव्ह्यू घेतला. मात्र, रिव्ह्यूमध्ये विराट बाद असल्याचे स्पष्टपणे दिसले. त्यामुळे त्याला १३२ चेंडूत ४४ करून माघारी जावे लागले. दरम्यान, विराटने या खेळीवेळी ७५०० कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत.
विशेष म्हणजे जेमिसन आणि विराट हे दोघेही आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताता. विराट या संघाचा कर्णधार आहे.
Big Wicket For #NewZealand king Kohli Gone on 44runs #INDvNZ #WTC2021 pic.twitter.com/npo7pSmS74
— Ankush Dhavre (@AnkushDhavre) June 20, 2021
विराट बाद झाल्यानंतर रिषभ पंत ४ धावांवर जेमिसनविरुद्धच बाद झाला, तर रहाणेला नील वॅग्नरने ४९ धावांवर बाद केले. या दोघांचेही झेल यष्टीरक्षक टॉम लॅथमने घेतले. यानंतर रविंद्र जडेजा आणि आर अश्विनने डाव सावरण्याचा प्रयत्न करताना भारताला २०० धावांचा टप्पा पार करुन दिला. पण अश्विनही २२ धावांवर बाद झाला. रविवारी पहिल्या सत्राखेर भारताने ७ बाद २११ धावा केल्या.
हा सामना शुक्रवारी (१८ जून) सुरु होणार होता. मात्र, पहिल्यादिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. अखेर शनिवारी, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात झाली.
महत्त्वाच्या बातम्या –