काही दिवसांपूर्वी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी दिग्गज भारतीय फलंदाज राहुल द्रविडची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा कार्यकाळ टी२० विश्वचषकानंतर संपणार आहे. विश्वचषकातनंतर खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत द्रविड संघाच्या प्रशिक्षकाच्या रूपात त्याची जबाबदारी स्वीकारणार आहे. भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि सध्याचे झिंम्बाब्वे संघाचे मुख्य प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी द्रविडच्या प्रशिक्षकपदी करण्यात आलेल्या नियुक्तीविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याविषयीही त्यांचे मत स्पष्ट केले आहे.
लालचंद राजपूत एका मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदी केल्या गेलेल्या नियुक्तीविषयी त्यांचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “राहुलसाठी ही चांगली गोष्ट आहे की, तो आधीही भारताच्या १९ वर्षाखालील आणि भारत अ संघाचा प्रशिक्षक राहिला आहे. यादरम्यान त्याने खूप युवकांना सल्ले दिले आहेत, जे आज मुख्य संघाचा भाग आहेत. आगामी आयसीसी स्पर्धांत जिंकण्यासाठी द्रविड भारतीय संघाला मदत करेल. मला नाही वाटत की, भारतीय संघात आता जास्त बदल पाहायला मिळतील.”
लालचंद राजपूत यांनी रविवारी (७ नोव्हेंबर) झालेल्या अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड सामन्याविषयीही त्यांचे मत मांडलेले. त्यांच्या मते अफगाणिस्तान संघ त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडला हैराण करू शकत होता आणि त्यांनी सामन्यात जिंकण्यासाठी १६० पेक्षा जास्त धावसंख्या करावी लागेल. मात्र, रविवारी पार पडलेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा दारुण पराभव केला आहे. न्यूजीलंडने या सामन्यात ८ विकेट्सने विजय मिळवला आहे. अफगाणिस्तान संघ प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १२४ धावा करू शकला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने १८.१ षटकात विजय मिळवला.
अफगाणिस्तानचा या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. जर अफगाणिस्तान संघाने या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला असता, तर भारतीय संघ उपांत्या सामन्यात पोहोचण्याच्या शर्यातीत कायम राहिला असता. आता सोमवारी भारतीय संघ त्याचा विश्वचषकातील शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध खेळेल.






