इंग्लंड-न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका-श्रीलंका यांच्यातील सामन्यांच्या निकालानंतर आयसीसीनं बुधवारी खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली. आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठे फेरबदल झाले आहेत.
फलंदाजांच्या रँकिंगमध्ये दीर्घकाळापासून अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या जो रूटला त्याचाच देशबांधव हॅरी ब्रूककडून धोका आहे. हॅरीनं न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं, ज्यामुळे त्याला क्रमवारीत दोन स्थानांचा फायदा झाला. भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर यशस्वी जयस्वाल, विराट कोहली आणि शुबमन गिल यांना क्रमवारीत नुकसान सोसावं लागलं आहे.
जो रूट 895 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर असून हॅरी ब्रूक 854 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. हॅरीनं न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 171 धावांची दमदार खेळी केली. त्याचं कसोटीतील हे सातवं शतक आहे. या सामन्यात जो रूटला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला केवळ 23 धावाच करता आल्या. ब्रूकनं घेतलेल्या उडीमुळे यशस्वी जयस्वालला तोटा झाला असून तो ताज्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आला आहे. यशस्वीची दोन स्थानांनी घसरण झाली.
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला देखील एका स्थानाचं नुकसान झालं. कोहली सध्या 689 रेटिंगसह 14व्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत सहाव्या स्थानावर कायम आहे. सध्या टॉप 10 मध्ये फक्त यशस्वी आणि रिषभ हे दोनच भारतीय फलंदाज आहेत. शुबमन गिललाही एका स्थानाचं नुकसान झालं. तो 18व्या स्थानावर घसरला आहे. गिल दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी खेळला नव्हता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 डिसेंबरपासून मालिकेतील दुसरी कसोटी खेळली जाणार आहे. या कसोटीत चांगली कामगिरी करून आपली रँकिंग सुधारण्याचा भारतीय फलंदाजांचा प्रयत्न असेल.
हेही वाचा –
“पाकिस्तानची मनमानी चालणार नाही”, बीसीसीआयचा आयसीसीला कडक संदेश
13 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! भारताला एकहाती जिंकवून दिला सामना
दिवस-रात्र कसोटीत गुलाबी चेंडू का वापरतात? लाल आणि गुलाबी चेंडूत काय फरक असतो? सर्वकाही जाणून घ्या