आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) बुधवारी कसोटी खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानं भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडून अव्वल स्थान हिसकावून घेतलं आहे. त्यानं तीन स्थानांची झेप घेत पहिलं स्थान पटकावलं.
कागिसो रबाडानं बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार कामगिरी करत 9 विकेट्स घेतल्या होत्या. आता त्याच्या खात्यात 860 रेटिंग गुण आहेत. बुमराह (846) तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. पुण्यात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (847) दुसऱ्या स्थानावर असून आर अश्विन (831) चौथ्या आणि कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्स (820) पाचव्या स्थानावर आहे.
रावळपिंडीत इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत स्फोटक कामगिरी करत पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज नोमान अलीनं टॉप10 मध्ये प्रवेश केला. या सामन्यात नोमाननं नऊ विकेट घेतल्या. त्यानं आठ स्थानांनी झेप घेतली असून तो नवव्या स्थानावर पोहचला आहे. त्याच्याच देशाचा फिरकी गोलंदाज साजिद खान या सामन्यात 10 विकेट घेत 12 स्थानांनी पुढे सरकत 38व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताविरुद्धच्या पुणे कसोटीत 13 बळी घेणारा न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरनं कसोटी गोलंदाजांच्या यादीत 30 स्थानांनी झेप घेत 44व्या स्थानावर मजल मारली आहे. त्याचे 458 रेटिंग गुण आहेत.
फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांचं मोठं नुकसान झालं. कोहली 7 स्थानांनी घसरून 14व्या स्थानावर फेकला गेला आहे. दुसऱ्या कसोटीत तो फ्लॉप ठरला होता. त्यानं पुण्यात एकूण 18 धावा केल्या. त्याच्या खात्यात 688 गुण आहेत. रोहितला 9 स्थानांचं नुकसान झालं. तो आता 24व्या क्रमांकावर घसरला आहे. त्याचे 649 गुण आहेत. ‘हिटमॅन’नं पुणे कसोटीत फक्त 8 धावा केल्या होत्या. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (708) खराब कामगिरीमुळे पाच स्थानांनी घसरून 11व्या स्थानावर पोहचला आहे.
टॉप10 फलंदाजांमध्ये फक्त एक भारतीय आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वाल 790 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याला एका स्थानाचा फायदा झाला. जयस्वालनं दुसऱ्या कसोटीत 30 आणि 77 धावांची खेळी खेळली होती. न्यूझीलंडचा रचिन रवींद्र (10) आणि पाकिस्तानचा सौद शकील (7) यांनी देखील झेप घेतली.
फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट (903) अव्वल स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुखापतीमुळे भारताविरुद्धची कसोटी मालिका खेळत नसला तरी तो दुसऱ्या स्थानावर कायम आहे. त्याच्या खात्यात 813 रेटिंग गुण आहेत. इंग्लंडचा हॅरी ब्रूक (778) चौथ्या आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (757) पाचव्या स्थानावर आहे.
हेही वाचा –
ऑस्ट्रेलियानं मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ वाढवला, पॅट कमिन्स या स्पर्धेपर्यंत करणार संघाचं नेतृत्व
गुजरात टायटन्सनं शमीला रिटेन केलं नाही? शुबमन गिलसह हे दोन खेळाडू संघात कायम!
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये विचारला 6 लाख रुपयांचा क्रिकेटचा प्रश्न! तुम्हाला उत्तर माहित आहे का?