---Advertisement---

ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट विराट कोहलीसोबत घडली

On: बुधवार, फेब्रुवारी 26, 2020 7:24 PM
---Advertisement---

सोमवारी (24 फेब्रुवारी)  बेसिन रिझर्व (Basin Reserve) येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताला 10 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे.

या सामन्यानंतर आयसीसीने आज (26 फेब्रुवारी) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. याचा परिणाम त्यांना कसोटी क्रमवारीत भोगावा लागला आहे. 

यात फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) जागा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) घेतली आहे. स्मिथने 911 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. तर, विराट 906 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. तसेच, चेतेश्वर पुजाराची 7व्या क्रमांकावरून 9व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

मात्र, अजिंक्य रहाणे (760) आणि मयंक अगरवाल (727) आपापल्या स्थानांवर कायम आहेत. त्यांनी पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात चांगली कामगिरी केली आहे. याव्यतिरिक्त न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने 853 गुणांसह एका स्थानाची प्रगती केली आहे. तो चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.  

तसेच गोलंदाजांच्या क्रमवारीतही भारतीय गोलंदाजांना नुकसानाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंड विरुद्ध  खराब गोलंदाजी प्रदर्शन करणारे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी पहिल्या 10च्या क्रमवारीतून बाहेर झाले आहेत. मात्र, 3 विकेट्स घेणारा आर अश्विन 9व्या क्रमांकावर आहे.

तर, भारताविरुद्ध 9 विकेट्स घेणारा न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊथीने 9 स्थानांची झेप घेतली आहे. तो 794 गुणांसह 15व्या क्रमांकावरून थेट 6व्या क्रमांकावर पोहोचला आहे. शिवाय ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिंस प्रथम क्रमांकावर कायम आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---