इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या ४० व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्स संघाला ७ गडी राखून पराभूत केले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने सनरायझर्स हैदराबादसमोर १६५ धावांचे आव्हान ठेवले होते.हे आव्हान सनरायझर्स हैदराबाद संघाने ९ चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केले होते. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या जागी संधी मिळालेल्या जेसन रॉयने ६० धावांची तुफानी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता. या विजयानंतर राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएल स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे. चला तर जाणून घेऊया ४० सामने होऊन गेल्यानंतर कशी आहे गुणतालिकेची सध्यस्थिती.
राजस्थानची वाढली चिंता
सनरायझर्स हैदराबाद संघाकडून पराभूत झाल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता प्लेऑफ गाठण्यासाठी या संघाचा मार्ग आणखी कठीण झाला आहे. राजस्थान संघाने आतापर्यंत एकूण १० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना ४ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ६ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सध्या हा संघ ८ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात विजय मिळवून राजस्थान रॉयल्स संघाला टॉप- ५ मध्ये प्रवेश करण्याची सुवर्णसंधी होती.
तसेच केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा सनरायझर्स हैदराबाद संघ जवळ जवळ आयपीएल २०२१ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. राजस्थानविरुद्ध मिळवलेला विजय हा आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसराच विजय ठरला. सनरायझर्स हैदराबाद संघाने आतापर्यंत आयपीएल २०२१ स्पर्धेत एकूण १० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना अवघ्या २ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या हा संघ ४ गुणांसह गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे.
चेन्नई अव्वलस्थानी कायम
तीन वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्स संघ १६ गुणांसह गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी आहे. चेन्नई संघाने आतापर्यंत एकूण १० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना ८ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले तर, २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसऱ्या स्थानी १६ गुणांसह दिल्ली कॅपिटल्स संघ आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने देखील १० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना ८ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे.तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघ ८ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.